Fever Pudhari
नाशिक

Nashik Viral Fever | नाशिकमध्ये 'व्हायरल फीव्हर'चा धुमाकूळ वैद्यकीय तपासणीत आढळले हजारांवर रुग्ण

Nashik Viral Fever | डेंग्यू, स्वाईन फ्लूने नाशिककरांना घाबरवून सोडले असतानाच शहरात 'व्हायरल फीव्हर'ने धुमाकूळ घातला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
डेंग्यू, स्वाईन फ्लूने नाशिककरांना घाबरवून सोडले असतानाच शहरात 'व्हायरल फीव्हर'ने धुमाकूळ घातला आहे. पालिकेच्या वैद्यकीय पथकांच्या तपासणीत या तापसदृश आजाराचे तब्बल १००८ रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या केवळ सव्वा लाख घरांच्या तपासणीतील असून, प्रत्यक्षात संपूर्ण शहरातील रुग्णसंख्या यापेक्षा पाच ते सहा पटीने अधिक असण्याची शक्यता आहे.

महापालिकेसह खाजगी रुग्णालयांमध्ये व्हायरल फीव्हरची लागण झालेल्या रुग्णांची ओसंडून वाहणारी गर्दी या आजाराच्या प्रादुर्भावाचे गांभीर्य अधोरेखित करणारी ठरत आहे.
डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या कीटकजन्य आजारांसह स्वाईन फ्लूसारख्या घातक आजारांच्या साथीची नाशिकमध्ये लागण झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यातच आता 'व्हायरल फीव्हर'ची झालेली लागण नाशिककरांना धडकी भरवणारी ठरली आहे.

आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरी आरोग्य सेवा केंद्रांच्या मार्गदर्शनाखाली ३३० पथके तयार केली आहेत. या पथकांमार्फत शहरातील विशिष्ट भागातील १ लाख २८ हजार ६७५ घरांमधील ४ लाख ८३ हजार ६४३ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल १००८ जणांना तापसदृश आजाराची अर्थात व्हायरल फीव्हरची लागण झाल्याचे समोर आले.

ही आकडेवारी केवळ महापालिकेच्या सर्वेक्षणातील असून, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या या आजाराने पीडित रुग्णांची संख्या यापेक्षा पाच ते सहा पटीने अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डेंग्यू १६०, तर स्वाईन फ्लूचा आकडा ३०७ वर

शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. १ ते २३ सप्टेंबर या कालावधीत डेंग्यूचे ५९ नवे रुग्ण आढळल्याने डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा १६० वर गेला आहे. तर या कालावधीत स्वाईन फ्लूचे १६० नवे रुग्ण आढळल्याने स्वाईन फ्लू बाधुतांचा एकूण आकडा ३०७ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत स्वाईन फ्लूचे ५० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ११ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे.

३३५९ ठिकाणी डासांच्या अळ्या

महापालिकेच्या वैद्यकीय पथकांमार्फत घरोघरी करण्यात येत असलेल्या तपासणीत आतापर्यंत १ लाख ९२ हजार २३९ कंटेनर अर्थात पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. त्यात तब्बल ३,३५९ कंटेनरमध्ये डेंग्यूला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती प्रजातीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. या सर्व कंटेनरमधील पाणी वाहते करण्यात आले असून, १०३२ कंटेनरमध्ये अबेटिंगची प्रक्रिया करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT