Narhari Zirwal  Pudhari
नाशिक

Narhari Zirwal | दिंडोरी दुर्घटनेनंतर झिरवाळ यांना स्थानिकांचा घेराव

Narhari Zirwal | 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न करीत वाचला तक्रारींचा पाढा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरीतील विहीर दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा बळी गेल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण पाहायला मिळाले. या मतदारसंघातील मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता, त्यांना संतप्त स्थानिकांनी घेराव घातला.

या निष्पाप मृत्यूंना जबाबदार कोण, असा प्रश्न करीत नागरिकांनी क्लासचालक आणि विहीरमालकावर कठोर कारवाईची मागणी केली. नरहरी झिरवाळ रुग्णालयात पोहोचताच नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. विहिरीला संरक्षक कठडा नसणे, रस्त्याचे अर्धवट काम आणि क्लास व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा यांवर स्थानिकांनी झिरवाळांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.

जर विहिरीला जाळी असती किंवा कठडा उंच असता, तर ९ जीव वाचले असते असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. यानंतर माध्यमांसमोर झिरवाळ म्हणाले की, आजचा दिवस दिंडोरीसाठी काळा दिवस आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर पावले उचलली जातील. विहीरमालकाने घराला कंपाउंड केले. मग विहिरीला सुरक्षा का दिली नाही? नगरपालिकेने रस्ता विहिरीपर्यंत नेऊन तिथेच संपवला. तिथे संरक्षक भिंत असणे गरजेचे होते. याप्रकरणी विहीरमालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

जाळी बसवण्याची मागणी

विहीरमालकाचे नातेवाईक अॅड. विक्रम राजे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ही विहीर १९७२ पासूनची आहे. दुष्काळात याच विहिरीने संपूर्ण गावाला पाणी दिले आहे. विहिरीला जाळी आणि अंगल होते. मात्र, ते कोणीतरी काढून नेले. नगरपंचायतीने रस्त्यावर जाळी बसवावी, अशी आमचीही मागणी होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

घटनेमुळे सेवापूर्ती कार्यक्रम रद्द

अपघातात मृत्यू झालेले ५ विद्यार्थी मविप्रच्या जनता इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी होते. हे सर्व अतिशय हुशार असल्याने मविप्र परिवारावर शोककळा पसरली. ४ जुलैला विद्यालयाच्या उपशिक्षिका सुमन वीरकर यांचा सेवापूर्ती कार्यक्रम होणार होता. यास मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे उपस्थित राहणार होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मविप्र संस्थेने हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. सरचिटणीस ठाकरे, संचालक प्रवीण जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांनी दरगोडे कुटुंबाचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT