नाशिक ः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत दमण, दीव व दादरा-नगरहवेली येथील महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे 20 बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रकरणी तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत 11 लाख 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे व उपअधीक्षक अ. सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 9 जानेवारीस मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नाशिक - मुंबई आग्रा रोडवर विल्होळी शिवारात जैन मंदिरासमोर वाहन तपासणीसाठी सापळा रचण्यात आला होता. यावेळी संशयित कार (जीजे 5, आरएक्स 917) थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये विक्रीस बंदी असलेले विदेशी मद्याचे 20 बॉक्स आढळून आले.
या प्रकरणी समरबहादूर स्वामीदयाल यादव (35, रा. वलसाड), भावेशकुमार राजेशभाई पटेल (26, रा. वापी) व फैजलखान निजामखान शेख (28, रा. धरमपूर) तसेच त्यांच्या इतर व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींकडून मद्यसाठा, कार व चार मोबाइल असा 11 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक संजय सावंत, गणेश नागरगोजे, सहायक दुय्यम निरीक्षक गायकवाड यांच्यासह दीपक आव्हाड, विजेंद्र चव्हाण, सागर पवार, संदीप देशमुख, अनिता भांड यांनी यशस्वीपणे पार पाडली.