

दिंडोरी : राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला, जर्दा, सिगरेट्स व तत्सम साहित्य असा नऊ कोटी सहा लाखांचा ऐवज नाशिकच्या अन्न व सुरक्षा भरारी पथकाने तळेगावातील इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनी आवारातून जप्त केला. याप्रकरणी संचालकासह आठ जणांविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्याच मतदारसंघात ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दिंडोरी येथील इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड ही आस्थापित कंपनी आहे. या कंपनीत संशयास्पदरीत्या प्रतिबंधित ऐवजाचा साठा दडवून ठेवल्याची गोपनीय माहिती नाशिकच्या अन्न व सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या आधारे अन्न व औषध प्रशासन सुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी यांच्या विशेष भरारी पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी जी. व्ही. कासार, जी. एम. गायकवाड यांनी ग्लोबल टोबॅको एजन्सी, सम्राट फिपियू इंडस्ट्रीजच्या इगतपुरी, नाशिक रोड, गोंदे दुमाला आदी ठिकाणी छापे टाकून तपासणी केली असता, या ठिकाणी विविध प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा आढळला होता.
त्यापैकी सबा प्रीमियम प्रिमिक्स ऑफ शिशा या प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या लेबलवर दिंडोरी- तळेगावातील इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड असे नाव आढळले. त्यामुळे पथकाने त्या ठिकाणी जाऊन वरिष्ठ अधिकारी व पथकातील अधिकारी भेट दिली असता, क्वॉलिटी एक्झ्युकेटिव्ह ऋतिक कुमार चौधरी हा भेटला. तेथे विविध प्रकारच्या सिगरेट्सचे उत्पादन होत असल्याचे निदर्शनास आले. त्या ब्रँड्सची तपासणी केली असता, विविध घटकांपासून विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू उत्पादन होत असल्याचे दिसून आले.
यात विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू असा एकूण 9 कोटी 6 लाख 25 हजार 425 रुपयांचा ऐवज जप्त करून प्रतिबंधित उत्पादनाचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या प्रकरणी कंपनीचे संचालक विपीन शर्मा, एक महिला, सुसंता कुमार पांडा, व्यंकट रमेश पेनुमाक, दयानंद रेव यांच्या विरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासणीअंती पितळ उघडे
इगतपुरी, नाशिकरोड व गोंदे येथे तपासणी दरम्यान आढळलेल्या प्रतिबंधित ऐवज साठ्यावर मौजे तळेगाव (ता. दिंडोरी) येथे खुलेआम प्रतिबंधित उत्पादन करणाऱ्या मे. इलाइट क्रॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे लेबल सापडले व त्यावरून या कंपनीचे हे पितळ तपासणीअंती उघडे पडले. यावरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय असल्यामुळे अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.