नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी येथेच्छ खरेदी करीत बाजारपेठेला झळाळी दिली. विशेषत: वाहन आणि सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. दोन ते तीन वाजेच्या मुहूर्तावर वाहन, इलेक्ट्रॉनिक्स व इतर वस्तू खरेदीसाठी नाशिककरांनी सहकुटुंब बाजारात गर्दी केली होती तर, सोने खरेदीसाठी रात्री ११.२० ते १२.४० चा मुहूर्त असल्याने रात्री उशिरापर्यंत सराफ बाजारात ग्राहकांची वर्दळ दिसून आली. याशिवाय फ्लॅट, रो-हाऊस, प्लॉट खरेदीचाही मुहूर्त साधल्याने, रिअल इस्टेटला मोठा बुस्ट मिळाला.
दसरा, दिवाळी अगोदरच केंद्र सरकारने जीएसटी दरात कपात केल्याने, वाहनांसह, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किंमती कमालीच्या कमी झाल्या. बांधकाम साहित्यांवर लादला जाणारा जीएसटी कमी केल्याने, त्याचा परिणाम घरांच्या किंमती कमी होण्यावर झाला. या संधीचा नाशिककरांनी लाभ घेत, दसऱ्याच्या मुहूर्तावर जोरदार खरेदी केली. वाहन बाजारात तब्बल ४०० कारची विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. ७० ईव्ही कारची डिलिव्हरी दिली गेली. यंदा ग्रामीण भागात पावसाने मोठे नुकसान केले असले तरी, ९० पेक्षा अधिक ट्रॅक्टरची विक्री झाल्याचा अंदाज आहे तर, ३० ट्रकची विक्री केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय दुचाकींमध्ये मोठी उलाढाल झाली. सुमारे २२०० पेक्षा अधिक दुचाकींची विक्री झाली तर, ३५० पेक्षा अधिक ईव्ही दुचाकी खरेदी केल्या.
रिअल इस्टेट क्षेत्रालाही मुहूर्तावर मोठी झळाळी मिळाली. शहरात ३५० पेक्षा अधिक फ्लॅटची बुकींग करण्यात आल्याचा अंदाज आहे. याशिवाय ५० रो-हाऊसेस बुक करण्यात आली असून, ५०० नाशिककरांनी मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी (दि.२) सकाळपासूनच नाशिककरांनी साइट व्हिजिट केल्या. काहींनी लगेचच बुकींगला प्राधान्य दिले, तर काहींनी दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत निर्णय घेण्याचा शब्द दिल्याने, पुढील काही दिवसांत रिअल इस्टेट क्षेत्रात आणखी मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारातही ग्राहकांची मोठी रेलचेल दिसून आली. मुहूर्तावर वस्तू खरेदी करणे शुभ असल्याने, अनेकांनी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, ओव्हन, फॅन, एसी आदी वस्तू खरेदी केल्या. सुमारे ९० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा अंदाज आहे तर, मोबाइल बाजारातही मोठी उलाढाल झाली. सुमारे १५ कोटींपेक्षा अधिक मोबाइल विक्री केल्याचा विक्रेत्यांनी अंदाज व्यक्त केला.
सोने-चांदीला मोठी झळाळी
सोने-चांदीचे दर सर्वकालीन उच्चांकावर असतानाही नाशिककरांनी खरेदीसाठी अजिबातच हात आखडता घेतला नसल्याचे दिसून आले. सकाळी ११ ते रात्री १२ वाजेपर्यंत ग्राहकांची सराफ बाजारात मोठी गर्दी दिसून आली. सोने-चांदी खरेदीतून २५० ते ३०० कोटींची उलाढाल झाल्याचा विक्रेत्यांनी अंदाज व्यक्त केला असला तरी, प्रत्यक्षात हा आकडा मोठा असल्याचे बोलले जात आहे. मुहूर्तावर सोने २४ कॅरेट प्रति तोळा जीएसटीसह एक लाख २१ हजार पाचशे रुपये, २२ कॅरेट सोने प्रति तोळा जीएसटीसह एक लाख ११ हजार आठशे रुपये तर, चांदी प्रति किलो जीएसटीसह एक लाख ५३ हजार इतका दर होता.
रात्री बारा वाजेनंतरही मोठी वर्दळ
राज्यात दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना रात्रभर सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी दिल्याने, दसऱ्याच्या मुहूर्तावर रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्वच दुकाने सुरू होती. सराफ बाजारात रात्री २ वाजेपर्यंत गर्दी होती. याशिवाय इलेक्ट्रॉनिक बाजारातील वर्दळ कायम होती. वाहन बाजारातही उशिरापर्यंत ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. शासनाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता आल्याचे, विक्रेत्यांनी सांगितले.
ऑफर्सचा भरपूर लाभ
मुहूर्तावर खरेदीचा उत्साह आणखी वाढावा यासाठी विक्रेत्यांनी ग्राहकांसाठी विविध आॅफर्स उपलब्ध करून दिल्या होत्या. वाहन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू दिल्या. इलेक्ट्रॉनिक बाजारातही भेटवस्तूंची मोठी रेलचेल दिसून आली. सराफ व्यावसायिकांनी आॅनलाइन खरेदीची सोय उपलब्ध करून दिल्याने, अनेक नाशिककरांना घरबसल्या वस्तू खरेदीचा आनंद घेता आला.
बँका, फायनान्सही जोरात
बहुतांश ग्राहकांनी कर्ज काढून हप्त्यांवर वस्तू खरेदी केल्या. यासाठी विविध बँका, फायनान्स कंपन्यांनी काही मिनिटात कर्ज उपलब्ध करून दिल्याने, ग्राहकांना वस्तू खरेदी करणे शक्य झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ न केल्यामुळे घरांवरील हप्ता आटोक्यात असल्याने, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला.
४०० कार + ७० ईव्ही कार + ९० ट्रॅक्टर + ३० ट्रक
२२०० दुचाकी + ३५० ईव्ही दुचाकी
३५० फ्लॅट + ५० रो-हाऊस बुकींग + ५०० पझेशन
सोने २५० ते ३०० कोटी उलाढाल
इलेक्ट्रॉनिक वस्तू ९० कोटी + मोबाइल १५ कोटींची उलाढाल
(आकडे विक्रेत्यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार)
सोने-चांदीच्या वाढत्या दराचा विचार न करता, ग्राहकांनी मुहूर्तावर खरेदीला प्राधान्य दिले. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. गुंतवणूकदारांनीही मोठी गर्दी केली होती.गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.
अपेक्षेपेक्षाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. नरेडको सभासदांचे सुमारे ३५० फ्लॅटचे बुकींग झाले. रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ न केल्याने, त्याचा ग्राहकांना मोठा फायदा झाला. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीपर्यंत हा प्रतिसाद कायम राहिल.सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको, नाशिक.
जीएसटी दर कमी केल्याने, वाहन खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल दिसून आला. चारचाकी, दुचाकींमध्ये मोठी उलाढाल झाला. याशिवाय ईव्ही वाहनांचे फायदे आता ग्राहकांना समजू लागल्याने, ईव्ही खरेदीकडेही मोठा कल दिसून आला.समकीत शाह, सह संस्थापक, जितेंद्र ईव्ही.