

नाशिक : सम्राट अशोक विजयादशमी, ६९ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच ऐतिहासिक महाबोधी वृक्ष द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि.२) त्रिरश्मी बौद्ध लेणी येथे भीमसागर उसळला होता. सकाळपासूनच धम्म उपासक-उपासिकांची गर्दी होती. हजारो बौद्ध उपासकांनी बुद्धस्मारकात तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत अभिवादन केले. चा विजय असो' आणि 'जय भीम'चा जयघोष करीत तरुणांनी प्रवर्तन दिनाचा उत्साह वाढवला.
शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धस्मारक परिसरात सकाळी ९ वाजता पंचशील धम्मध्वजाचे रोहण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन, सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच महाबोधी वृक्ष वंदना घेण्यात आली. सकाळी ११ वाजता भिक्खु संघास भोजनदान करण्यात आले. भिक्खु संघाची धम्मदेसना तसेच उपासकांना भोजनदान व खीरदान करण्यात आले. यावेळी शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भिक्खु सुगत थेरो, कार्यवाह भिक्खु संघरत्न, सल्लागार भदन्त यु नागधम्मो महाथेरो, सदस्य भदन्त सुगत शान्तेय, भदन्त बुद्धसिरी आदी उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बुद्धलेणी परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे सायंकाळनंतर परिसर उजळून निघाला होता. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले होते. तर अनुचित घटना टाळण्यासाठी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिवसेना शहराध्यक्ष प्रवीण तिदमे यांनीही त्रिरश्मी बुद्ध लेणी येथे भेट देत अभिवादन केले. रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांची याठिकाणी रेलचेल सुरू होती.
जाहीर धम्म सभेचे आयोजन
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासन व शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोंबर २०२३ रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील सम्राट अशोकांच्या काळातील २३०० वर्षांपूर्वीच्या महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात आले होते. या महाबोधी वृक्षाच्या स्थापनेला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तसेच विजयादशमीनिमित्त जाहीर धम्म सभा घेण्यात आली. यावेळी भिक्खुंचे धम्म प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम, सर्वरोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी कार्यक्रमही आयोजित केले होते.
बुद्ध-भिम गीतांच्या कार्यक्रमाने रंगत
गायक संतोष जोंधळे प्रस्तुत 'भिभ संध्या' या बुद्ध-भिम गीतांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. याशिवाय विविध सामाजिक व राजकीय संघटनांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही संघटनांनी नाश्त्यासह भोजनाची व्यवस्था केली होती तर, काही संघटनांनी प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले होते. पुस्तक विक्री स्टॉललाही उपासक उपासिकांची चांगली पसंती मिळाली.