नाशिक

नाशिक शहरात अघोषित भारनियमन, विनासूचना वीज पुरवठा खंडीत; नागरिक उकाड्याने हैराण

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– दररोज बरसणाऱ्या अवकाळी पावसाच्या सरी अन् पावसाळापूर्व कामांमुळे शहर व परिसरात वारंवार वीज खंडीत केली जात आहे. तासनतास वीज गायब होत असल्याने हे अघोषित भारनियमनच तर नाही ना, असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. रात्री पावसाचा शिडकावा अन् दिवसभर उन्हाचा चटका यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला असून, कधी उकाडा तर कधी गारवा अशी स्थिती आहे. अशात वीज खंडीत होत असल्याने, नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणकडून विविध कामे हाती घेतली जातात. त्यासाठी वेगवेगळ्या भागात वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, कोणत्याही प्रकारच्या सूचना न देता दिवसभर वीज पुरवठा खंडित करण्याचा प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. वास्तविक, वीज पुरवठा खंडित करताना ग्राहकांना त्याबाबतचे संदेश प्रसारित करणे आवश्यक असते. मात्र, महावितरणकडून याबाबतची तसदी घेतली जात नसल्याने, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संतापजनक म्हणजे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधल्यास, त्यांच्याकडून उद्धटपणे उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. दरम्यान, वीज पुरवठा तासनतास खंडीत केला जात असला तरी, वीज बिल वाढीव रक्कमेचेच येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सातपूर परिसरात नित्याचाच त्रास

सातपूर परिसरात वीज खंडीत होणे नित्याचेच झाले असून सोमेश्वर कॉलनी, सदगुरू नगर, खांदवे नगर, गणेश नगर या परिसरात वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी नागरिकांना न कळविता दिवसभर वीज खंडीत केली जाते. तर पावसाचा शिडकावा झाला तरी, बत्ती गुल होत असल्याचे प्रकार या भागात घडत असल्याने, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT