Trimbakeshwar Temple Controversy Pudhari File Photo
नाशिक

Trimbakeshwar Temple Controversy | चप्पल स्टॅण्डमधून लाखोंची कमाई ; त्र्यंबकेश्वरमध्ये सोयी-सुविधांचा अभाव

Trimbakeshwar Temple Controversy | देवाच्या दारी क्षणभर विसावा मिळेल, या आशेने आलेला भाविक येथील कमाईची हाव पाहता निराश होत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वरः पुढारी वृत्तसेवा

देवाच्या दारी क्षणभर विसावा मिळेल, या आशेने आलेला भाविक येथील कमाईची हाव पाहता निराश होत आहेत. भाविकाला चप्पल स्टॅण्डची सुविधादेखील मंदिर ट्रस्टने पुरविलेली नाही. यापूर्वी असलेल्या प्रशासकांनी यामधून उत्पन्नवाढीचा मार्ग शोधला आहे. मात्र याच चप्पल ठेवण्याच्या वादात भाविकांना व्यावसायिकांची शिवीगाळ आणि दमदाटी सोसावी लागत आहे.

वास्तविक पाहता कोणत्याही मंदिरात दर्शनास आलेल्या भक्तांची पादत्राणे ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली असते. त्यासाठी काही मंदिरांमध्ये नाममात्र पैसे आकारले जातात, तर काही ठिकाणी ती मोफत असते. देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मात्र अशी कोणतीही व्यवस्था नाही.

काही वेळेस वर्दळीच्या रस्त्यावर चप्पल काढून ठेवण्याची वेळ येते, तर एका दरवाजाला कुलुपाच्या आत अशी सोय केलेली आहे. भाविक आत जाताना तेथे चपला काढून ठेवतात. मात्र बाहेर येताना ते कुलूपबंद दरवाजाच्या बाहेर पोहोचतात. त्यावेळी त्यांना येथे हजर असलेल्या शिपाई कर्मचारी यांच्या नाकदुऱ्या काढत विणवण्या करण्याची वेळ येते.

दोन-अडीच वर्षांपूर्वी तत्कालीन प्रशासक व मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके यांनी उत्पन्नवाढीचा मुद्दा पुढे करीत त्याचे टेंडर काढले होते. भाविकांना ५ रुपयेप्रमाणे तीन ठिकाणी चप्पल स्टॅण्ड उभारले आणि त्याचा ठेका दिला. या माध्यमातून नगर परिषदेला वार्षिक १२ लाख रुपये म्हणजेच महिन्याला १ लाख रुपये उत्पन्न मिळते हे दाखविले.

वास्तविक पाहता मुख्याधिकारी या देवस्थान ट्रस्टच्या सचिव आहेत. मात्र त्यांनी भक्तांचे हित न पाहता, उत्पन्नाचा मार्ग शोधला. दरम्यान एक स्टॅण्ड थेट वर्दळीच्या भागात अतिक्रमणात असल्याचे एका सुजाण नागरिकाने प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आणि तो चप्पल स्टॅण्ड बंद करण्यास भाग पाडले.

दरम्यानच्या कालावधीत मुख्याधिकारी देवचके यांची बदली झाली. तेव्हा चप्पल स्टॅण्डची ठेकेदारी नगर परिषदेने बंद करावी, अशी अपेक्षा होती. मात्र तसे घडले नाही. त्र्यंबकेश्वर मंदिरात एका दिवसाला १० हजार भाविक आले व त्यापैकी ५ हजार भाविकांनी चप्पल स्टॅण्डचा वापर केला, तर दिवसाला २५ हजार रुपये मिळतात. संबंधित ठेकेदाराला ५ हजार रुपये खर्च वजा जाता २० हजार रुपये शिल्लक राहतात. दिवसाकाठी २० हजार रुपये कमाईचा गोरखधंदा बंद होईल, असे दिसत नाही.

अनुदानांचा वर्षाव

शासनाने त्र्यंबकेश्वर शहराचा अ वर्ग तीर्थक्षेत्र आणि अ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून समावेश केला व नगर परिषदेला भरीव अनुदानाचा मार्ग मोकळा केला आहे. त्र्यंबक नगर परिषदेला वर्षाकाठी १ कोटी ७५ लाख यात्राकर अनुदान मिळते. यामधून भक्तांसाठी सुविधा निर्माण करणे, सेवा उपलब्ध करणे अपेक्षित आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट दर महिन्याला १० लाख रुपये पाणीपुरवठ्याचे वीज बिल भरण्यास मदत अनुदान देत आहे. आतापर्यंत भाविकांच्या दानातील ३ कोटी रुपये देण्यात आले आहे, तरीही त्र्यंबक नगर परिषद भाविकांना चप्पल ठेवण्याची सुविधा मोफत पुरवत नाही. देवस्थान ट्रस्टदेखील ही आपली जबाबदारी आहे, असे मानायला तयार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT