त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गाठून २०० रुपयांचा देणगी दर्शन पास चढ्या दराने विक्री करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. प्राथमिक चौकशीत आतापर्यंत भामट्यांनी एकुण १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाप्रकारे अंदाजे पाच हजार भाविकांना ७०० ते एक हजार रुपयांना पास विक्री करुन भक्त आणि देवस्थान ट्रस्टची लाखो रुपयांना फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी भाविकांची गर्दी होत असते. शिवाय, श्रावण मासमध्ये तर महिनाभर भक्तांची मांदियाळी होते. यात राज्याच्या विविध भागांसह देशभरातील भाविकांचा समावेश असतो. परिणामी, पूर्व दरवाजासमोरील मोफत दर्शनरांग मोठी होऊन भाविकांना दिर्घ प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत मंदिर व्यवस्थापनाकडून प्रति व्यक्ती २०० रुपये देणगी आकारुन दर्शन रांगेचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासाठी मंदिरापासून काही अंतरावर दर्शन पास काउंटर उघडण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन दर्शन पासचीही सुविधा आहे. मात्र, याविषयी माहिती नसणाऱ्या बाहेरगावच्या भाविकांना गंडवणारी टोळी सक्रीय झाली होती.
२०० रुपयांचा ऑनलाईन पास एक हजार रुपयांपर्यंत विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची मंदिराचे पदसिध्द अध्यक्ष अतिरीक्त सत्र न्यायाधीश सचिन भन्साळी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गंभीर दखल घेत त्र्यंबक पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने बारकाईने तपास करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून पाच जणांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आल्या आहेत.
दिलीप नाना झोले, सुदाम राजु बदादे (रा. पेगलवाडी), समाधान झुंबर चोथे (रा. रोकडवाडी), शिवराज दिनकर आहेर (रा. निरंजनी आखाड्या जवळ), मनोहर मोहन शेवरे (रा. रोकडवाडी) या संशयितांची चौकशी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवी मगर आणि प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
संशयित, बनावट नाव, पत्ता आणि ओळखपत्र क्रमांक वापरुन ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना ७०० ते १,००० रुपयांना विक्री करीत असल्याचे त्यांच्याकडील मोबाईल आणि ई मेल आयडी हिस्ट्रीवरुन दिसुन आले आहे. संबंधितांवर गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई झाली आहे. तपासात त्यांनी एकुण १६४८ बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये एकुण अंदाजे पाच हजार भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचे दिसुन आले आहे. हा सर्व प्रकार ऑनलाईन पास सिस्टीम सदोष असल्याने झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची अवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.