

त्र्यंबकेश्वर / नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषद आणि पर्यटन स्थळास 'अ' वर्ग दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला 'अ' वर्गाचा दर्जा जाहीर केला होता. विभागीय आयुक्तांनी जानेवारी 2025 मध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला 'अ' वर्गाचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविला होता.
यानंतर मार्च 2025 मध्ये राज्य सरकारने त्र्यंबकेश्वर देवस्थानाला 'अ' वर्गाचा दर्जा जाहीर केला होता. त्यानंतर आता त्र्यंबक नगरपरिषद आणि त्र्यंबकेश्वर या स्थळास 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा जाहीर केला आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर शहराचा विकास होण्यास मदत होणार आहे. तर त्र्यंबकेश्वर देवस्थान तीर्थक्षेत्राला 'अ' वर्गाचा दर्जा जाहीर केल्यामुळे शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचे मार्ग खुले झाले होते.