

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातील व्हीआयपी दर्शन तिकिटांच्या काळाबाजाराचा प्रकार उघडकीस आला आहे. ६०० रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार २२ मार्च रोजी निदर्शनास आला होता. यानंतर, खात्री करण्यात येऊन १५ एप्रिलला त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी संशयित नारायण मुर्तडक (रा. त्र्यंबकेश्वर) याच्या विरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंदवला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. दर्शनासाठी लागणाऱ्या रांगा टाळण्यासाठी अनेक भाविक देणगी पास घेतात. मात्र, या प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या काही भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरत (गुजरात) येथील चिराग दालिया व काही भाविक मार्च महिन्यात त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसरात त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटली. त्याने थेट दर्शनासाठी शॉर्टकट व्हीआयपी पास देऊ केला. त्यामुळे या व्यक्तीकडून त्यांनी प्रत्येकी २०० रुपये किमतीची तीन ऑनलाइन, अहस्तांतरणीय देणगी तिकिटे तब्बल दोन हजार रुपयांना विकत घेतली. मात्र, या तिकिटांना उत्तर महाद्वारावरील संगणकीय स्कॅनिंग यंत्राने नाकारले. यामुळे सुरक्षारक्षकांनी त्यांना प्रवेश नाकारला.
संगणकीय प्रणालीमध्ये तिकिटावरील तपशील आणि भाविकांच्या आधारकार्डवरील नाव भिन्न आढळल्यामुळे संबंधित पास अमान्य करण्यात आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या भाविकांनी तत्काळ ट्रस्ट कार्यालयात धाव घेतली आणि देवस्थानच्या चेअरमन यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला. तक्रारीत तिकीट पुरवणाऱ्या 'नारायण' नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता. त्यानुसार ट्रस्ट प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासात संशयिताची ओळख पटवण्यात आली असून, भाविकांची १,४०० रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.