Janori Kumbh Mela 2026 Pudhari News Network
नाशिक

Singhstha Kumbh Mela Nashik 2026 | सिंहस्थापूर्वी त्र्यंबकेश्वरचा कायापालट! गोदाघाटावर उभारणार गौतम ऋषी अन् गोदावरी मातेच्या भव्य मूर्ती

Singhstha Kumbh Mela Nashik 2026 | नवीन आर्थिक वर्षात एक कोटींची तरतूद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात धार्मिक पर्यटन विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्र्यंबकेश्वर येथील गोदाघाट परिसरात गौतमऋषी आणि गोदावरी मातेच्या भव्य मूर्ती उभारण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला असून, त्यांच्या मंजुरीनंतर कुंभ प्राधिकरण प्रकल्पाअंतर्गत १ कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

कुंभ प्राधिकरण प्रकल्पाअंतर्गत माध्यमातून पर्यटनस्थळ विकास कार्यक्रमांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गोदाघाट परिसराचा सर्वांगीण विकास करताना धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

घाटावर उभारण्यात येणाऱ्या गौतमऋषींच्या मूर्तीमुळे त्र्यंबकेश्वराशी निगडित पौराणिक वारसा अधिक ठळकपणे समोर येणार आहे, तर गोदावरी मातेची मूर्ती भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र ठरणार आहे.

त्र्यंबकेश्वर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याने येथे वर्षभर देशभरातून लाखो भाविक येतात. विशेषतः कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे भाविकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घाट परिसराचे सुशोभीकरण आणि विकास करणे आवश्यक ठरत आहे.

या प्रकल्पामुळे परिसर अधिक आकर्षक होऊन पर्यटनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, या प्रकल्पात केवळ मूर्ती उभारणीच नव्हे, तर घाट परिसराचे सौंदर्याकरण, पायाभूत सुविधा, प्रकाशयोजना आणि स्वच्छतेवरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

त्यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित आणि सुटसुटीत वातावरण मिळणार आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी जिल्ह्यात विविध विकासकामांना वेग देण्यात आला असून रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, निवासव्यवस्था आणि वाहतूक यांसारख्या सुविधा सुधारण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

असा असेल प्रकल्प

एकूण खर्च : १ कोटी रुपये ठिकाण : त्र्यंबकेश्वर, गोदाघाट उभारल्या जाणाऱ्या मूर्ती : गौतमऋषी व गोदावरी माता योजना : कुंभ प्राधिकरण प्रकल्पाअंतर्गत निधी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT