Dahanu News Pudhari
नाशिक

Ozar Illness Death | ओझरमध्ये हृदयद्रावक घटना! डोळ्यांदेखत मुलाचा मृत्यू; वृद्ध आईच्या आक्रोशाने परिसर हेलावला

Ozar Illness Death | ओझर उड्डाणपुलाखाली माय-लेकाचा उघड्यावरचा संसार क्षणात उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

ओझर : पुढारी वृत्तसेवा
गडाख कॉर्नर जवळील उड्डाणपुलाखाली उघड्यावर संसार करणाऱ्या एका वृद्ध माऊलीवर काळाने मोठा आघात केला. डोळ्यांदेखत मुलाने जीव सोडला. तिला ज्या मुलाचा आधार होता त्याच्याच मृत्यूनंतर आता ७० वर्षीय वृद्ध आईसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. पुलाखाली फाटक्या गादीवर निपचित पडलेला मुलगा आणि त्याला उठवण्यासाठी आक्रोश करणारी आई हे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहून परिसरातील नागरिकही हेलावून गेले होते.

गडाख कॉर्नर उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या काशाबाई लक्ष्मण जाधव यांचा मुलगा मंगेश लक्ष्मण जाधव याचा आज मृत्यू झाला. काशाबाई या मुलगा मंगेशसोबत पुलाखालीच उघड्यावर राहून मजुरी करत होत्या.

उदरनिर्वाहासाठी भीक मागणे तसेच कचरा वेचण्याचे कामही त्या करत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार मंगेश गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आजारी होता. मंगळवारी सकाळी आठला आईने त्याला चहा दिला. त्यानंतर मंगेशने 'आई, मी देवाघरी जाईल', असे म्हटले अन् काही वेळातच त्याला मृत्यूने गाठले.

मंगेशला पाहण्यासाठी शेजारी राहणारे दीपक ओमप्रकाश दलोड आणि त्यांचे एक मित्र तिथे आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर मंगेशचा मृत्यू झाल्याची खात्री केली. मंगेशच्या मृत्यूबद्दल कोणावरही संशय किंवा तक्रार नसल्याचे काशाबाई यांनी पोलिसांना सांगितले असून, आजारपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी जबाबात नमूद केले आहे.


या घटनेनंतर शिवसेनेचे गटनेते सुनील कदम, शहरप्रमुख नितीन काळे, नगरसेवक रोहित लमडे, किशोर त्रिभुवन, नगर परिषदेचे सफाई अधिकारी गणेश महाजन, जितू खत्री, अनिल बंदरे आदींनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केले. स्थानिक प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन त्यांना निवारा, आवश्यक मदत, शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

"कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या माय-लेकाचा संसार उघड्यावर पडला. 'सबका विकास'मधील ही दारिद्र्य आणि उदरनिर्वाहाची दरी किती खोल स्वरूपाची आहे हे साक्षात जाणवले."
- नितीन काळे, शहरप्रमुख, शिवसेना (उबाठा)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT