नाशिक : श्रावण महिन्यातील सोमवार तसेच १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक त्र्यंबकेश्वर येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. पहिल्या, दुसऱ्या व चौथ्या श्रावण सोमवारी अंदाजे एक ते दीड लाख, तर तिसऱ्या सोमवारी सुमारे चार ते साडेचार लाख भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक - त्र्यंबकेश्वर मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वाहतूक नियमन करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली.
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नियमित वाहतूक आणि भाविकांची वाहने एकाच मार्गावर आल्यास वाहतूक कोंडी तसेच अपघाताची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चारही रविवार व सोमवारसाठी सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत वाहतूक नियमनाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
.. असे असेल वाहतुकीचे पर्यायी नियोजन
जव्हार, मोखाडा, पालघरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गान नाशिककडून तसेच या भागातून नाशिककडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. नाशिक-गोवर्धन-गिरणारे-धोंडेगाव-देवरगाव-वाघेरा फाटा-आंबोली फाटा-जव्हार या मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. जव्हारकडून नाशिककडे येणारी वाहतूक याच मार्गाने उलट दिशेने राहील.
त्र्यंबकनगरीमध्ये खासगी वाहनांना बंदी
त्र्यंबकेश्वर शहरातील वाहनतळाची क्षमता अपुरी असल्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील खासगी वाहने शहरात न नेता, खंबाळे येथील बाह्य वाहनतळावर थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे कार, टॅक्सी, रिक्षा, चारचाकी खासगी वाहनांनी त्र्यंबकेश्वर शहरात न जाता, खंबाळे येथील बाह्य वाहनतळाचा वापर करावा. खंबाळे येथून भाविकांच्या पुढील वाहतुकीसाठी आवश्यकतेनुसार एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.