Tomato Price Pudhari
नाशिक

Tomato Price Crash | सिन्नर तालुक्यात टोमॅटोचे दर गडगडले; पांढुर्ली उपबाजार समितीत क्रीटमागे अवघे 100 रुपये भाव

Tomato Price Crash | शेतकऱ्यांच्या हातात 30 ते 40 रुपये तोडणी, वाहतूक खर्चाने उत्पादक हवालदिल

पुढारी वृत्तसेवा

विंचुरीदळवी : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासह पश्चिम पट्ट्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी दरघसरणीमुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. पांढुर्ली उपबाजार समितीत टोमॅटोला क्रीटमागे अवघे १०० रुपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च तर दूरच, तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.

काही दिवसांपूर्वी ४०० ते ५०० रुपये मिळणारे टोमॅटोचे दर अचानक घसरल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. टोमॅटोच्या एका क्रीटच्या तोडणीसाठी मजुरांना ३० रुपये, तर बाजार समितीत माल पोहोचवण्यासाठी २० रुपये वाहतूक खर्च द्यावा लागतो. अशा प्रकारे तोडणी आणि वाहतुकीवरच ५० रुपये खर्च होतात. त्यात हमाली, तोलाई आणि अन्य खर्चाची भर पडते.

परिणामी, १०० रुपये दर मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हातात प्रतिक्रीट केवळ ३० ते ४० रुपये उरतात. रोपांची लागवड, खते, औषधे, बांधणी आणि मजुरीसाठी केलेला मोठा खर्च पाहता हे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दुष्काळात बाग फुलवली
यंदा पावसाची अनियमितता आणि पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. पाण्याचे काटेकोर नियोजन करत टोमॅटोच्या बागा जगवल्या. मात्र, पीक काढणीला आले असताना बाजारभावाने दगा दिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे पाणीटंचाईचे संकट आणि दुसरीकडे दरघसरण, अशा कात्रीत उत्पादक अडकले आहेत.

या कवडीमोल भावात काढणीचा मजुरी खर्च, बाजारपर्यंतचा वाहतूक खर्चही निघत नाहीये. घरातून पैसे लावून माल बाजारात विकण्याची वेळ आली आहे. शासनाने बागायती पिकांना, भाजीपाल्याला हमीभाव किंवा अनुदान दिले नाही, तर हातात आलेला माल रस्त्यावर फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
— लक्ष्मण भोर, माजी सरपंच, विंचुरीदळवी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT