Malegaon Municipality Election / मालेगाव महापालिका Pudhari News Network
नाशिक

Tipu Sultan Photo Controversy | टीपू सुलतानच्या फोटोवरून राजकीय वातावरण तापले

Tipu Sultan Photo Controversy | शिंदे गटाचे उपमहापौर कार्यालयाबाहेर आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टीपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याच्या कथित प्रकारावरून गुरुवारी (दि. २७) महापालिकेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत उपमहापौर कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

कार्यालय तातडीने उघडावे, दालनातील छायाचित्रांची शहानिशा करावी आणि शासनाच्या परिपत्रकानुसारच महापुरुषांची छायाचित्रे लावावीत, अशी मागणी आंदोलक नगरसेवकांनी केली.
उपमहापौरांच्या दालनात टीपू सुलतानचा फोटो लावण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर शिंदे गटाचे नगरसेवक एकत्र आले. त्यांनी या प्रकाराचा निषेध करीत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उपमहापौरांचे कार्यालय बंद असल्याने ते तातडीने उघडण्यात यावे आणि दालनातील फोटोची प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महापालिकेच्या कार्यालयांमध्ये छायाचित्रे लावताना शासनाच्या नियम व परिपत्रकांचे पालन करणे आवश्यक आहे. संबंधित परिपत्रकात ज्या व्यक्ती अथवा महापुरुषांची छायाचित्रे लावण्यास परवानगी आहे, त्यानुसारच कार्यालयांमध्ये फोटो लावण्यात यावेत. त्यामुळे उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेल्या टीपू सुलतानच्या फोटोबाबत प्रशासनाने नियमांची तपासणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका नगरसेवकांनी मांडली.

दरवाजा तोडण्याचा इशारा

आंदोलनादरम्यान शिंदे गटाच्या नगरसेवकांनी अधिक आक्रमक भूमिका घेत, टीपू सुलतानचा फोटो हटवण्यात आला नाही तर उपमहापौर कार्यालयाचा दरवाजा तोडून कार्यालयात प्रवेश करण्याचा इशारा दिला. त्यामुळे काही काळ महापालिका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
फोटो कोणाच्या आदेशाने लावण्यात आला? त्यासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली होती का? तसेच हा फोटो लावण्यास कोणत्या नियमाचा आधार घेण्यात आला, याची माहिती प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. संबंधित फोटो नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाल्यास तो तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

वाद चिघळण्याची शक्यता

टीपू सुलतानच्या फोटोवरून सुरू झालेल्या या वादाचे पडसाद आगामी काळात महापालिकेच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, शासनाकडून कोणता अहवाल प्राप्त होतो आणि संबंधित फोटोबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणी नगरसचिव साजिद अहमद यांनी महापुरुषांची छायाचित्रे लावण्याबाबत शासनाकडून अहवाल मागवून त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या या स्पष्टीकरणानंतरही शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली. प्रशासनाने या प्रकरणाची स्पष्ट व अधिकृत शहानिशा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT