सिन्नर : सिन्नर तालुक्यातील सोनंबे शिवारात स्वामी नारायण इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात शेतीचे काम करीत असताना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास बिबट्या आणि तरसाने एकाच वेळी शेतकऱ्यावर हल्ला केला. शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संपत विठोबा शिनारे (42)असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते गेल्या चार ते पाच वर्षांपासून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची शेती बटाईने करतात. शिनारे हे शेतात गवत कापणीचे काम करीत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्याच वेळी तरसानेही हल्ला केला. ही बाब त्यांचा मुलगा अनुज सिनारे याच्या लक्षात आली. त्याने धाव घेत तरस आणि बिबट्यावर दगडांनी मारा केला. त्यामुळे दोन्ही जंगली श्वापदे पळून गेली आणि संपत सिनारे यांचा जीव वाचला. त्यांना तातडीने नाशिक रोड येथे उपचारांसाठी हलविण्यात आले.
या घटनास्थळापासून जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या खापराळे शिवारात देखील सायंकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान तरसाने महिलेवर हल्ला केल्याची घटना घडली. संबंधित महिला परिसरात म्हशी चारत होती.
या घटनेत महिला जखमी झाली असून धूम ठोकण्याच्या प्रयत्न असलेल्या तरसाला म्हशीच्या धडकेत प्राण गमवावे लागल्याचे सांगितले जात आहे. जखमी महिलेवर देखील नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.