Simhastha Kumbh Mela Nashi Pudhari News Network
नाशिक

Nashik Simhastha Kumbh Mela : दररोज सिंहस्थकाळात होणार हजार टन कचरा

मनपा स्वच्छतेसाठी नेमणार ८, ९६४ कंत्राटी सफाई कर्मचारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आसिफ सय्यद आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो साधू-महंत तसेच कोट्यवधी भाविकांसह नाशिककरांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियोजन केले आहे. सिंहस्थकाळात प्रतिदिन सुमारे एक हजार मे. टन कचऱ्याची निर्मिती होण्याचा प्रशासनाचा अंदाज असून, या काळात शहर स्वच्छतेसाठी कायम सफाई कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त तब्बल ८,९६४ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची नाशिक महापालिकेकडून जोरदार प्रशासकीय तयारी सुरू आहे. सिंहस्थकाळात स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत नाशिक शहरात घंटागाड्यांद्वारे प्रतिदिन सरासरी ७५९ मे. टन कचरा गोळा केला जातो. सिंहस्थकाळात शहरातील कचऱ्याचे प्रमाण प्रतिदिन ८५० मे. टनापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. तपोवनात सुमारे चार लाख साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी तब्बल एक हजार एकर जागेवर साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. या साधुग्रामधून प्रतिदिन सुमारे १४५ मे. टन कचऱ्याची निर्मिती होईल, असा घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कयास आहे.

अशा प्रकारे सिंहस्थकाळात नागरिक, भाविकांच्या माध्यमातून तसेच साधुग्रामधून सुमारे एक हजार मे. टन कचऱ्याची निर्मिती होईल. या कचऱ्याचे संकलन व खतप्रकल्पावर वाहतुकीसाठी तब्बल २८. ३७ कोटींचा खर्च केला जाणार आहे. सिंहस्थकाळात स्वच्छतेसाठी महापालिकेकडील मनुष्यबळ अपुरे पडणार असल्याने कंत्राटी तत्त्वावर ८९६४ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

यामध्ये साधुग्राम परिसरात तीन सत्रांत स्वच्छतेसाठी ४०००, साधुग्राममधील शौचालयांच्या साफसफाईसाठी १३९४, साधुग्राममधील साफसफाईसाठी ११६०, रामकुंड, शाहीमार्ग, होळकर पूल ते तपोवन गोदाबाट स्वच्छतेसाठी ७२०, तसेच उर्वरित कर्मचाऱ्यांची भाविक मार्गाच्या स्वच्छतेसाठी नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी ९१.६३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

खतप्रकल्पाचे विस्तारीकरण करणार

सिंहस्थ कुंभमेळ्यात येणारे भाविक तसेच नाशिक शहराची वाढती लोकसंख्या, कचऱ्याच्या प्रमाणात होणारी वाढ लक्षात घेता या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेतर्फे अस्तित्वातील खतप्रकल्पाचादेखील विस्तार केला जाणार आहे. यासाठी खतप्रकल्पालगतची २३ एकर आरक्षित जागा संपादित केली जाणार असून, या प्रक्रियेला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे.

जैविक प्रकल्प स्थलांतरित करणार

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा द्वारका परिसरात गोदावरी नदीकिनारी असलेला जैविक कचरा (बायोडिग्रेडेबल वेस्ट) प्रकल्प प्रदषणाच्या कारणांमुळे अन्यत्र हलविण्यात येणार आहे. त्यासाठी मनपा हद्दीलगत जागेचा शोध घेतला जाणार असून, नगररचना विभागाकडे त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महापालिकेचा सध्या द्वारका येथील प्रकल्प २४ वर्षे इतका जुना झाला आहे. यामुळे हा प्रकल्प कालबाह्य तर झाला आहे शिवाय त्याची मुदतही २०२६ मध्ये संपुष्टात येत आहे.

16,915 तात्पुरती शौचालये

सिंहस्थकाळात शहरातील आठ प्रमुख मार्गावर २२ ठिकाणी वाहनतळांची निर्मिती केली जाणार आहे. या वाहनतळांवर पुरुषांसाठी ५,८१०, खियांसाठी ४,७४५ तर तृतीयपंथीयांसाठी १६० अशा प्रकारे एकूण १०,७९५ तर भाविक मागविर रस्त्याच्या दुतर्फा २०० मीटर अंतरावर प्रत्येकी एक याप्रमाणे ६२०० अशा प्रकारे एकूण १६,९१५ तात्पुरत्या शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी तब्बल ४७.३५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या तात्पुरत्या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी पाणी पुरवठा करण्याबरोबरच कंत्राटी सफाई कामगारांची देखील नियुक्ती केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT