जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी भक्ष म्हणून लक्ष करणारा बिबट्या सध्या नरभक्षक प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. Pudhari News Network
नाशिक

Pudhari Special Ground Report | नरभक्षक बिबट्याची दहशत

Nashik News : वर्षभरात आठ नागरिकांसह 1,347 प्राण्यांचा बळी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : निखिल रोकडे

जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्राणी भक्ष म्हणून लक्ष करणारा बिबट्या सध्या नरभक्षक प्राणी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात विशेषत: लहान मुलांवरील हल्ले आणि त्यात झालेले मुलांचे मृत्यू यावरून बिबटे नरभक्षक होण्याकडे वेगाने वाटचाल करीत असल्याचे दिसत आहे. वन विभागाची गेल्या चार महिन्यातील बिबट्यांच्या हल्यांचा अभ्यास केल्यास हे हल्ले शिकार म्हणूनच बिबट्याने केल्याचे स्पष्ट होत आहे. बिबट्याच्या आल्यानंतर बालकांचे मृतदेह सापडले त्या मृतदेहांच्या अवस्थेवरून ही बाब अधोरेखीत झाले आहे.

वन विभागाकडून बिबट्यांना पकडण्यासाठी मोहीम उघडले जात आहे. यासाठी मानवी बळ तसेच अत्याधुनिक यंत्रणा व साधनसामग्रीचा वापर केला जात आहे. त्याला काही प्रमाणात यशही मिळत आहे. मात्र, बिबट्यांची संख्याच इतकी मोठी आहे की, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न अपुरे आहे.

बिबट्यांची संख्याच अधिक असल्यामुळे नाशिकमध्ये जवळपास तीन लाख हेक्टर होऊन अधिक वनक्षेत्र आहे. गेल्या वर्षभरामध्ये ८ नागरिक व १३४७ प्राणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये नाशिक जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेले आहे.

बिबट्यापासून बचावासाठी अशा करा उपाययोजना

  • कामानिमित्त वाडी-वस्ती ते शेत त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी यांचे घरापासून शाळेत जा-ये करताना शक्यतो समुहाने जावे.

  • विविध जत्रा-यात्रा, उरुस, हंगाम या कालावधीत वाडी-वस्ती वरून रात्री घरी परतताना विशेष काळजी घ्यावी.

  • शेतात वाकून काम करताना बिबट्याने पाठीमागून हल्ला करण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी विशेष दक्ष रहावे.

  • बिबट्याने मनुष्याप्राण्यावर किंवा पशुधनांवर हल्ला केल्यास त्याची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे कार्यालयात द्यावी.

  • संध्याकाळच्या वेळेस घराच्या अंगणात किंवा परिसरामध्ये लहान लहान मुले महिला व जेष्ठ नागरिक यांची विशेष काळजी घ्यावी.

  • आतापर्यंतच्या घटनामध्ये लहानमुले, स्त्रिया यांच्यावर रात्री हल्ले झाले आहेत त्यामुळे अंगणात लाईट किंवा शेकोटी असावी

  • जनावरांना रात्रीच्या वेळी गोठ्यात बांधताना गोठा सर्व बाजूंनी बंदिस्त करावा.

  • गुरे चारायला घेवून जाताना समुहाने जावे.तसेच जास्त दूर जाऊ नये

  • बिबट्या संदर्भात प्राप्त होणाऱ्या चुकीच्या बातम्या, अफवा पसरवू नयेत

  • मोबाईल अथवा रेडिओवर गाणी चालू ठेवून तसेच शक्यतो घुंगराची काठी जवळ बाळगून सहकाऱ्याबरोबर शेतात पाणी द्यावे,

  • रात्रीच्या वेळी हे अत्यंत आवश्यक आहे.रात्री उघड्यावर झोपू नये.

  • बिबट्याचा पाठलाग करू नये. कारण तो घाबरुन उलटा हल्ला करु शकतो.

  • बिबट्या समोर आल्यास जोरात आरडा ओरडा करावा, खाली वाकू नये.

बिबट्याची बदलती जीवनशैली प्रमुख आव्हान

बिबट्या अतिशय धोकादायक प्राणी आहे. त्यांनी बदलत्या काळानुसार आपली जीवनशैली व कार्यपद्धती बदलली आहे. पूर्वी बिबटे झाडावर चढत नव्हते सध्याचे बिबटे झाडावरही सहज चढतात. हरीण व ससे हे त्यांचे पूर्वी खाद्य असायचे आता मात्र कोंबडी बकरी अशा प्राण्यांनाही ते लक्ष करतात. पिंजरामध्ये बकरीची प्रतिकृती ठेवल्यास तरी पिंजऱ्यात पूर्वी बिबटे अडकत असे मात्र आता जिवंत बकरी ठेवूनही बिबटे पिंजऱ्यात अडकत नाही.ट्रॅप कॅमेरे मध्ये बिबटे हे पिंजऱ्याभोवती फिरताना दिसतात मात्र पिंजऱ्यामध्ये भक्ष दिसत असताना सुद्धा पिंजऱ्यात जात नाही.

उत्तर महाराष्ट्रातील जिल्हानिहाय वनक्षेत्र (जिल्हा आणि चौ. किमी.)

  • नाशिक १५५३०

  • धुळे ७१९५

  • नंदुरबार ५९५५

  • जळगाव ११७६५

  • एकूण ४०४४५

वर्षभरातील बिबट्याच्या हल्ल्यातील जीवितहानी अशी...

  • २५ एप्रिल रोजी पायल राजेंद्र चव्हाण (वय २१ वर्षे) रा. वनारवाडी दिंडोरी, नाशिक

  • २० जून जान्हवी सुरेश मेंगाळ (वय ३ वर्षे) रा. गोंदे सिन्नर, नाशिक

  • ८ ऑगस्ट आयुष किरण भगत (वय ४ वर्षे) रा. वडनेर दुमाला, नाशिक

  • ८ ऑगस्ट जनाबाई जगन बदादे (वय ६५ वर्षे ) रा. दिंडोरी, नाशिक

  • 8 सप्टेंबर सारंग गणेश थोरात (वय १० वर्षे ) रा. थोरात वस्ती, पंचाळे, सिन्नर, नाशिक

  • १३ सप्टेंबर गोलू युवराज शिंगाडे अवघ्या दीड वर्ष वयाचा, रा. निमगाव, देवपूर रस्ता, सिन्नर, नाशिक

  • २३ सप्टेंबर श्रुतीक गंगाधर (वय 2 वर्षे) रा. वडनेर, देवळाली, नाशिक

वन विभागाकडून नुकसान भरपाई

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यास तर नागरिक प्राणी अथवा शेतीचे नुकसान यासाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. यामध्ये जर नागरिकाचा मृत्यू झाल्यास तर वारसा २५ लाख रुपये दिले जातात. प्राण्यांमध्ये त्यांचे प्रकार व शेतीचे झालेलं नुकसान यावरचे मूल्यमापन करून रक्कम ठरविले जाते.

2024-25 या आर्थिक वर्षात वनविभागाकडून याप्रकारे नुकसान भरपाई दिलेली आहे

  • नाशिक पश्चिम (1,77,86,112)

  • नाशिक पूर्व (1,33,75,858)

  • नंदुरबार (2,312,946)

  • जळगाव (1,38,61,660)

ऊस क्षेत्रांत बिबट्याचे सर्वाधिक वास्तव्य

जिल्ह्यामध्ये ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. ऊसाच्या पिकाची पूर्ण वाढ होण्यास नऊ महिन्याहून अधिक कालावधी लागतो. ऊसाच्या शेतीला बाहेरूनच कडेकडेने पाणी दिले जाते. शेतकरी थेट उसाच्या शेतीमध्ये जात नाही.त्यामुळे बिबट्याला तेथे वास्तवासाठी मोठा सुरक्षित कालावधी मिळतो.तसेच तेथे प्रजननही होते त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे.

वनविभागाच्या उपाययोजना अशा...

  • वन विभागाकडून बिबट्या हल्ले संदर्भात जनजागृती केली जाते.

  • बिबट्या क्षेत्रामध्ये पिंजरे लावणे.

  • बिबट्याच्या शोध साठी थर्मल ड्रोन,एआय,ट्रॅप कॅमेरे यांचा वापर

  • नियमित फिरते गस्त पथक

  • साऊंड सिस्टिम द्वारे नागरिकांना आवाहन

  • विविध ठिकाणी होर्डिंग

  • सोशल मीडियावर रिलीजद्वारे प्रचार

बिबट्यांची वाढती संख्या वन विभागाची डोकेदुखी

नाशिक जिल्ह्यामध्ये ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे.ऊसाच्या पिकाची पूर्ण वाढ होण्यास नऊ महिन्याहून अधिक कालावधी लागतो. ऊसाच्या शेतीला बाहेरूनच कडेकडेने पाणी दिले जाते.शेतकरी थेट उसाच्या शेतीमध्ये जात नाही.त्यामुळे बिबट्याला तेथे वास्तवासाठी मोठा सुरक्षित कालावधी मिळतो.तसेच तेथे प्रजननही होते.त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढत आहे.

बिबटे ठार मारण्याची प्रक्रिया क्लिष्ट

बिबट्या हा वन्यजीव प्राणी असल्यामुळे त्याला ठार मारण्यास सक्त मनाई आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये वनविभाग एखादा बिबट्या जर खूप नरभक्षक झाला असेल तर त्याला ठार मारले जाऊ शकते.अशाच एका प्रकरणांमध्ये चंद्रपूर येथे नर भक्षकवाघाला ठार मारण्यात आले होते.यासाठीची मोठी प्रक्रिया परवानगीची करावी लागते यामध्ये बराच कालावधी निघून जातो. तो बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावे लागते त्याचे पायाचे ठसे त्याबद्दलची पुरावे सर्व जोडल्यानंतरच ज्या बिबट्याकडून मानवी हल्ले सर्वाधिक झालेले आहे त्यालाच मारण्याची परवानगी मिळते सरसकट सर्व बिबटे मारण्याची परवानगी दिली जात नाही.

बिबटे ठार मारण्याची प्रक्रिया क्लिष्ट

बिबट्या हा वन्यजीव प्राणी असल्यामुळे त्याला ठार मारण्यास सक्त मनाई आहे. मात्र अपवादात्मक परिस्थितीमध्ये वनविभाग एखादा बिबट्या जर खूप नरभक्षक झाला असेल तर त्याला ठार मारले जाऊ शकते.अशाच एका प्रकरणांमध्ये चंद्रपूर येथे नर भक्षकवाघाला ठार मारण्यात आले होते.यासाठीची मोठी प्रक्रिया परवानगीची करावी लागते यामध्ये बराच कालावधी निघून जातो. तो बिबट्या नरभक्षक आहे की नाही हे पहिल्यांदा सिद्ध करावे लागते त्याचे पायाचे ठसे त्याबद्दलची पुरावे सर्व जोडल्यानंतरच ज्या बिबट्याकडून मानवी हल्ले सर्वाधिक झालेले आहे त्यालाच मारण्याची परवानगी मिळते सरसकट सर्व बिबटे मारण्याची परवानगी दिली जात नाही.

पिंजऱ्यात पकडलेले बिबटे हे नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले जातात. मात्र पुन्हा ते नागरी वस्तीत येतात ही वन विभागाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. काही बिबट्यांना पुणे मंचर येथे बिबट्यांसाठी स्वतंत्र क्षेत्र राखीव ठेवण्यात आलेले आहे तिथे त्यांना पाठविण्यात येते काही कालावधीपूर्वी मंचर येथे बिबट्याने हैदोस घातला होता, त्यामुळे त्या ठिकाणी एक स्वतंत्र जागा बिबट्यांसाठी राखीव करण्यात आले आहे.

बिबट्याच्या संरक्षणापासून सौर कुंपण

बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी आता विद्युत प्रवाह असलेले सौर कुंपण बसविले जाणार आहे.यामध्ये सौम्य स्वरूपाचा विजेचा प्रवाह असल्यामुळे बिबट्या कुंपण पार करू शकणार नाही.यासाठी वन विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी १०० गावांमध्ये सौर कुंपण बसविण्याचा प्रस्ताव दिलेला आहे.शामाप्रसाद मुखर्जी योजनेतून सौर कुंपण फसविले जाणार आहे.

श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर कुंपण देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली आहे.सदर योजना मात्र महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये राबवली जाते.वनालगतची जी काही क्षेत्र आहेत,अशा क्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत आहे.अशा गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून प्रसारित करण्यात येते. प्रत्येक वर्षी या यादीमध्ये काही नवीन गावांचा देखील समावेश करण्यात येतो. यासाठी विशिष्ट ठिकाणी १०० टक्के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायतचे ठराव झाल्यानंतर सदर प्रक्रिया राबवली जाते.

बिबट्यास नरभक्षक म्हणता येणार नाही.यासाठी विशिष्ट कारणे आहेत.बिबट्या हा खाली बसलेल्या व्यक्तीला अथवा लहान मुलाला डोळ्याच्या समांतर दिशेने दिसत असल्यामुळे प्राणी समजतो त्यानंतरच हल्ला करतो. शेती आणि विशेष करून रात्री नागरिकांनी बिबट्या दिसणाऱ्या क्षेत्रात काळजी घ्यावी.
प्रशांत खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक
बिबट्या हा अतिशय धोकादायक प्राणी आहे.त्याच्यापासून सावधगिरी बाळगावी.आपल्या भागामध्ये कुठेही बिबट्या दिसून आला त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा.
संतोष सोनवणे, सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग (पूर्व), नाशिक
आत्तापर्यंत सायंकाळी किंवा रात्रीच बिबट्याचे हल्ले केले आहेत. कारण त्यांचा तो 'एक्टिव्हीटी' टाईम असतो. शिवाय बिब‌ट‌्याचे भक्षक प्राणी यावेळी स्थिर व एकाच जागी असतात. दुर्देवाने याच वेळी अंगणात, घराबाहेर लहान मुलेही खेळत असतात. आतापर्यंत सार्वाधिक हल्ले लहान मुलांवरच झाले आहेत. बिबट्या त्यापेक्षा आकार व उंचीने मोठ्या असलेल्या प्राण्यावर हल्ला करत नाही. नाशिक जिल्ह्यात जिथे आणि जितके हल्ले झाले ते बिबट्याच्या डोळ्यांना समांतर पातळीवरील खाली बसलेले नागरिक व बालकांवरच झाले आहेत. बालके याचे सर्वाधिक शिकार झाले कारण ते मोठ्याप्रमाणे प्रतिकार विरोध करु शकत नाहीत.
अभिजीत महाले, बिबट्या रेस्क्यू टिम प्रमुख. नाशिक.
मुलांवरील बिबट्याचे हल्ले अत्यंत दुर्दैवी आहेत. मुले असो कि नागरिक त्यांच्यावरील हल्ले भयंकरच घटना असते. त् बिबट्या हा संधीप्रकाशात शिकार करत असतो. खेळणारी मुले त्याला त्याची शिकार वाटते. त्यामुळे तो हल्ला करतो. अशा घटना जिथे वारंवार घडत आहेत, त्या भागात आता अधिक सावधगिरी, दक्षता बाळगण्याची गरज आहे. वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्यांना पकडून अशा घटना पुन्हा होणार नाही, यासाठी ठोस आणि सर्वंकष उपाय योजावेत.
अभय उजागरे, वन्यजीव अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT