

सिन्नर (नाशिक) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून पंचाळे, खडांगळी, निमगाव-देवपूर, मेंढी या गावांच्या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाच्या अथक प्रयत्नांतून जेरबंद करण्यात यश आले. दोन मुलांचा बळी घेणारा हा बिबट्या ‘तोच’ आहे का, याबाबत ग्रामस्थांच्या मनात शंका आहे. मात्र, हल्ला केलेल्या बिबट्याची लाळ तपासून मोहीम आखण्यात आली होती. त्याप्रमाणे रेस्न्यू केलेला बिबट्या तोच असल्याचा दावा वनविभागाने केला आहे.
शुक्रवारी (दि. 19) सायंकाळी नऊच्या सुमारास डांबर नाला, देवपूर शिवार येथे चांगदेव लक्ष्मण जाधव यांच्या वस्तीवर सावजाच्या मागावर आलेल्या या मादी बिबट्याला गन शूटरने बेशुद्ध केले. त्यानंतर पकडण्यात आले.
या मोहिमेत उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम सिद्धेश सावर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघेरे, प्रशांत खैरनार, नीलेश कांबळे यांच्यासह सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, ननाशी, हरसूल, निफाड, संगमनेर, बोरिवली, छत्रपती संभाजी नगर वनपरिक्षेत्र तसेच नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकारी व डॉग स्कॉड यांचा समावेश होता. जवळपास 60 ते 70 अधिकारी-कर्मचारी आणि रेस्क्यू टीमच्या मेहनतीतून ही मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेसाठी पंचाळे परिसरातील पोलिस पाटील, सरपंच, पदाधिकारी, युवकवर्ग आणि ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली असल्याचे वन विभागाने सांगितले.
पूर्ण वाढ झालेल्या नरभक्षक मादी बिबट्याने गर्भधारणा केलेली असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने तानाजी भुजबळ यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. बेशुध्द केल्यानंतर नाशिक येथे पेठ रोडवरील म्हसरुळ शिवारातील बिब्बट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. मादी बिबट्या जेरबंद झाल्यानंतर मोहीम थांबविण्यात आली असून पथके आपापल्या कार्यक्षेत्रात रवाना झाल्याचे वनविभागाने सांगितले.