नाशिक : तपोवनातील साधुग्रामच्या जागेवर प्रस्तावित औद्योगिक प्रदर्शनी केंद्राची निविदा रद्द करण्यात आल्याचा संदेश महापालिकेच्या संकेतस्थळावर झळकल्याने पर्यावरणप्रेमींकडून आनंद व्यक्त केला गेला. मात्र, हा आनंद क्षणिक ठरला असून, निविदेचा पहिला कॉल रद्द करण्यात आला आहे, तर दुसरा कॉल मात्र अद्यापही कायम असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
साधुग्रामसाठी १८२५ वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आक्रमक होत आंदोलन उभे केले असताना साधुग्रामच्या जागेवर पीपीपी तत्त्वावर २२० कोटी रुपये खर्चातून माईस सेंटर अर्थात प्रदर्शनी केंद्र उभारण्याची निविदा महापालिकेने काढल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर झाला.
या आंदोलनात राजकीय पक्षांनीही उडी घेतल्याने प्रकरण राज्यभर गाजत आहे. काही साधू-संतांनी वृक्षतोडीला विरोध दर्शवला, तर काहींनी पाठिंबा दिला. विरोधक शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेससह सत्तारूढ महायुतीत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील वृक्षतोडीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देत भाजपची कोंडी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
वृक्षतोडीच्या मुद्यावरून महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची नाचक्की होत असल्याचे लक्षात आल्यानंतर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पंधरा हजार वृक्षांची लागवड करण्याचे जाहीर करत प्रदर्शनी केंद्राला स्थगिती देण्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली होती. मात्र, त्याच दिवशी या संदर्भातील निविदेला मुदतवाढ देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात होता.
अखेर महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शनी केंद्राची निविदा रद्द करण्यात आल्याचा संदेश झळकला. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले गेले. मात्र, निविदेचा पहिला कॉल रद्द करण्यात आला. दुसरा कॉल कायम असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पर्यावरणप्रेमींचा आनंद औटघटकेचा ठरला आहे.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रदर्शनी केंद्राला स्थगिती दिली होती. आता ही निविदा सूचना रद्द करण्यात आल्याचे समजते. महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात खुलासा करावा.राजू देसले, तपोवन वाचवा चळवळ
निविदा थांबवण्याचे आदेश मी पाच दिवसांआधीच दिले आहेत. निमाच्या मागणीनुसार माईस सेंटरची निविदा काढली होती. परंतु, आता सदरचे काम थांबविण्यात आले आहे. येथील एकही झाड काढणार नसून तूर्त माईसची निविदा थांबवली आहे.गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री