

नाशिक : महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तास अगोदर झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ५५० कोटींच्या १३ रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. निवडणूक घोषणेपूर्वी घाईघाईत बैठक घेत या रस्ते विकासाला चालना देण्यात आली आहे.
नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या दृष्टिकोनातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी शहरातील रस्त्यांच्या कामांची यादी तयार करून त्यानुसार महापालिकेने निधी मागणीसाठी प्रस्ताव सादर केले होते. त्यास महासभेची मान्यता मिळाली होती.
महापालिकेने सिंहस्थाची विविध विकासकामे तसेच प्रकल्पांसाठी १५ हजार १७२ कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला होता. या आराखड्याच्या अनुषंगाने निधी मिळावा, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली होती. त्याचप्रमाणे पोलिस विभागाने रस्त्यांचा प्राधान्यक्रम कळविला असून, त्यानुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत पहिल्या टप्प्यात ९३० कोटींचे १८ रस्ते, दुसऱ्या टप्प्यात २९८ कोटींचे नऊ रस्ते, तर तिसऱ्या टप्प्यात ४७ कोटींच्या एक रस्ता या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने निविदाप्रक्रिया राबविली असून, एकण २८ कामांपैकी आता १३ कामे करून घेण्याच्या दृष्टीने पात्र ठरलेल्या ठेकेदाराबरोबर करार करून घेण्यास तसेच वित्तीय मान्यतेस स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
१३३ कोटींच्या बचतीचा दावा
रस्तेकामांच्या निविदा प्रक्रियेत स्पर्धा झाल्याने प्राकलन दरापेक्षा ५.६० ते २२ टक्क्यांपर्यंत कमी दराच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यामुळे महापालिकेच्या सुमारे १३३ कोटींची बचत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. दरम्यान, कमी दराच्या निविदा आल्याने कामांचा दर्जा राखण्याचे आव्हान प्रशासनापुढे असणार आहे.
स्थायीची मान्यता मिळालेले रस्ते
विहितगाव (लॅम रोड) ते बिटको चौक ते जेल रोड गोदावरी नदीपर्यंत ५३ कोटी २० लाख
खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका ते आयटीआय सिग्नल पर्यंतचा रस्ता : ७५ कोटी
जनार्दन स्वामी मठ ते लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीम सिटी चौक रस्ता १२.५७ कोटी
विजय ममता चौक - टाकळीगाव- संगम पूल (साधुग्राम पोहोच रस्ता) : १८.६५ कोटी
निमाणी चौक ते मनपा हद्दीपर्यंतचा दिंडोरी रस्ता (घाटाकडे जाणारा रस्ता) : ५०.४४ कोटी
नांदूर पूल ते जत्रा हॉटेल (घाटाकडे जाणारा रस्ता विकसित करणे: ५८.३८ कोटी
एक्स्लो चौक ते गरवारे चौकापर्यंत (त्र्यंबक मुंबई महामार्ग जोडरस्ता): ५९.०७ कोटी
पुणे रोड दत्तमंदिर चौक ते सिन्नर फाटा (रेल्वेस्थानक जोड रस्ता) : १४.८४ कोटी
गंगापूर रोड बारदान फाटा ते सुला चौक (त्र्यंबक रोड जोड रस्ता) : ४६.६९ कोटी
संगम पूल ते मिर्ची हॉटेल चौक ते अमृतधाम-तारवाला चौक मखमलाबाद रोड : ६८. २५ कोटी
वडनेर गेट ते विहितगाव (रेल्वेस्थानक त्र्यंबक रोड जोड रस्ता): २५.१५ कोटी
लेखानगर एनएच ३ कलानगर चौक वडाळागाव- रविशंकर मार्ग: ३२.२२ कोटी
गंगापूर रोड जेहान सर्कल ते गंगापूर गाव मनपा हद्दीपर्यंतचा रस्ता : ४०.८६ कोटी