नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी आणि बदलत्या हवामानामुळे शहरातील साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल १९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे वर्षभरातील स्वाइन फ्लू बाधितांची संख्या ३५९ वर पोहोचली आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गर्दी वाढत असल्याने रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
जानेवारी ते जून या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे अवघे सात रुग्ण आढळले होते. मात्र, जुलैपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. जुलैमध्ये २१, ऑगस्टमध्ये ११९, तर सप्टेंबरमध्ये १९२ रुग्णांची नोंद झाली. जुलै आणि ऑगस्टमध्ये स्वाइन फ्लूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता.
सप्टेंबरमध्ये आणखी सहा जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये महापालिका हद्दीतील तीन, तर ग्रामीण भागातील आठ रुग्णांचा समावेश आहे. सध्या स्वाइन फ्लू बाधित २७ रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
खोकला किंवा शिंकताना बाहेर पडणाऱ्या थेंबांमधून इन्फ्लूएंझा-एच१एन१ विषाणूचा प्रसार होत असल्याने गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका वाढतो. हवामानातील बदल आणि आर्द्रतेमुळेही संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.
डेंग्यूचेही 182 रुग्ण:
स्वाइन फ्लूंसोबतच शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलैदरम्यान डेंग्यूचे ५६ रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये आणखी ४५ रुग्णांची भर पडली, तर सप्टेंबरच्या चार आठवड्यांत ८१ जणांना डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे डेंग्यूबाधितांची एकूण संख्या १८२ वर पोहोचली आहे. दरम्यान, सप्टेंबरमध्ये पाथर्डी फाटा परिसरात डेंग्यू संशयित एका मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या मृत्यूचा डेथ ऑडिट अहवाल दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे.