नाशिक

नाशिकमध्ये 15 पासून ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर 2023 या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यंदा या अभियानात कचरामुक्त भारत याबाबत विविध उपक्रमांद्वारे जनजागृती करणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दरवर्षी १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येते. तसेच २ ऑक्टोबर हा दिन स्वच्छता दिन म्हणून साजरा होतो. यंदाही केंद्र शासनाने हे अभियान राबविण्याचे निर्देश दिले आहेत. स्वच्छता ही सेवा २०२३ ची थीम कचरामुक्त भारत ही आहे. यामध्ये दृष्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे.

ग्रामीण भागातील बसस्थानक, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक वास्तू, वारसा स्थळे, नदीकिनारे, सार्वजनिक ठिकाण या ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करावयाची आहे. तसेच सार्वजनिक शौचालय, कचराकुंड्या, कचरा वाहतूक वाहन आदी सर्व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून दुरुस्ती, रंगकाम, साफसफाईचे निर्देश आहेत. त्यानुसार सर्व गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याने गेल्या वर्षी या अभियानात उत्कृष्ट काम केले असून, यंदाही सर्व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणीचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी दिले आहेत.

केंद्रीय मंत्री साधणार ऑनलाइन संवाद

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी ते संवाद कार्यक्रमाद्वारे सरपंच, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी तसेच शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे इतर अधिकारी यांच्याशी संवाद साधणार असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT