Delayed Monsoon Pudhari
नाशिक

Surgana Monsoon Delay | पावसाचे माहेरघर सुरगाण्यात पावसाने फिरवली पाठ

Surgana Monsoon Delay | राज्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेला आणि पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा सुरगाणा तालुका यंदा जून महिना पावसाअभावी चिंतेत सापडला आहे.

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव : पुढारी वृत्तसेवा

राज्यात सर्वाधिक पर्जन्यमान असलेला आणि पावसाचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा सुरगाणा तालुका यंदा जून महिना पावसाअभावी चिंतेत सापडला आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने भिजणारा हा डोंगराळ तालुका यंदा अजूनही कोरडाच आहे. अधूनमधून झालेल्या हलक्या सरींनी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा उघडीप कायम राहिल्याने खरीप हंगामाचे नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

सुरगाणा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीची मशागत, नांगरणी, कुळवणी कामे पूर्ण केली आहेत. भात, नागली, वरई, आणि उडीद पिकांसाठी बियाणे व खते खरेदी करून ठेवली आहेत. मात्र, जून महिना संपत आला तरी दमदार पाऊस न झाल्याने पेरणी रखडली आहे. ज्या शेतकऱ्यांनी किरकोळ पावसाच्या भरवशावर पेरणी केली. त्यांच्यासमोर बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

यंदा सुरगाण्यातील स्ट्रॉबेरी उत्पादकांनाही मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तालुक्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. जूनअखेरीस लागवड सुरू होते. मात्र, पावसाअभावी शेतात आवश्यक ओलावा नसल्याने रोपे लावायची कशी, हा प्रश्न पडला आहे.

लागवड उशिरा झाल्यास उत्पादनात घट होण्याबरोबरच बाजारपेठेतील सुरुवातीच्या दराचाही लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी डोंगरातील ओढे, नाले आणि लहान जलस्रोत अजूनही कोरडेच आहेत. जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध झाला नाही.

पावसावर अवलंबून असलेल्या आदिवासी भागातील शेतमजुरांनाही कामांचा अभाव जाणवत आहे. शेतकरी आता दररोज हवामानाचा अंदाज पाहत असून, आकाशाकडे आशेने नजर लावून बसले आहेत. पुढील काही दिवसात दमदार पाऊस न झाल्यास केवळ खरीप हंगामच नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .

स्ट्रॉबेरीची रोपे तयार आहेत. पण लागवड करता येत नाही. प्रत्येक दिवस उशीर म्हणजे उत्पादनावर परिणाम. वेळेत पाऊस झाला तरच हंगाम वाचेल. अद्यापही पावसाची चिन्हे दिसत नसल्याने पेरणीबाबत अनिश्चितता आहे.
- संदीप भोये, बोरगाव
पावसाशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. संपूर्ण वर्षाची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. वरुणराजाने कृपा करावी, एवढीच अपेक्षा आहे.
- संदीप ठाकरे, चिंचपाडा (जामले)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT