त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर  File
नाशिक

Trimbakeshwar Kumbh Mela | तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला कडेकोट बंदोबस्त

Trimbakeshwar Kumbh Mela | खासगी वाहनांना प्रवेशबंदी ; सीबीएस ते खंबाळेपर्यंतच भाविकांची वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त (दि. ३१) त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर महामार्गावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून भाविकांची वाहतूक सीबीएस बसस्थानकापासून खंबाळे वाहनतळापर्यंतच केली जाणार आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रण आणि पोलिस यंत्रणेच्या नियोजनाची चाचपणीही या माध्यमातून केली जाणार असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामीण पोलिसांत समन्वय साधण्यात आला आहे.

शहरातील विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या खोदकामामुळे प्रमुख शिवमंदिरांच्या परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्यात आले आहे. सातपूर येथील अमृत गार्डन तसेच त्र्यंबकेश्वर महामार्गावरील महिरावणी येथून जव्हार, पालघर आणि गिरणारेकडे जाणारी वाहतूक वळवण्यात येणार आहे.

गर्दीवर पोलिसांची नजर

गर्दी नियंत्रणासाठी चार स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. ६० दुचाकींवरून पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. महिला सुरक्षेसाठी निर्भया व दामिनी पथके तैनात करण्यात आली आहेत. गर्दीचे नियोजन आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. नियंत्रण कक्ष, वॉकी-टॉकी आणि सीसीटीव्ही नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जाणार आहे.

भाविकांना पोलिसांचे आवाहन

भाविकांनी सोबत कमीत कमी सामान आणावे. मौल्यवान वस्तू आणणे टाळावे. वाहने केवळ नियोजित वाहनतळांवरच उभी करावीत. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास किंवा आपत्कालीन मदतीची आवश्यकता असल्यास तातडीने डायल ११२ वर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT