मालेगाव : सादिक शेख
शहरात मोकाट श्वान व जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. वर्षभरात सात हजार 861 अबालवृद्धांना श्वानदंश झाला. यानंतरही महापालिकेला उपरती सुचली नसून निर्बीजीकरण मोहीम आठ महिन्यांपासून ठप्प झाली आहे. उच्चभ्रू असलेल्या कॅम्प भागात श्वानांचा उपद्रव सर्वाधिक आहे.
पूर्व भागातील कुत्रे तर उघड्यावरील मांसामुळे रक्ताला चटावली असून, लहान मुले त्यांच्या तावडीत सापडत आहेत. मनपा निर्बीजीकरण मोहीम यथातथाच राबवित असल्याने श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. श्वानांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नियुक्त संस्थेची बिले थकल्याने या संस्थेने काम बंद करत गाशा गुंडाळला. यामुळे आठ महिन्यांपासून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया ठप्प आहे. रोज सरासरी 21 श्वानदंशाच्या घटना होतात. शहरात सुमारे 45 हजारांपेक्षा जास्त भटके कुत्रे असल्याचा अंदाज आहे. महापालिकेचा मोकाट श्वानांच्या संख्येवर नियंत्रणासाठी निर्बीजीकरण मोहिमेवर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. उघड्यावर टाकलेले अन्न, उघड्यावरील मांस, मासळी विक्री यामुळे भटक्या श्वानांची गुजराण होत नसल्याने ते हिंस्त्र बनले आहेत. त्यातून श्वानदंशाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. रात्री-अपरात्री एकट्या-दुकट्याने जाताना भीती वाटते. चौकाचौकांत श्वानांच्याही टोळ्या डूख धरतात.
कॅम्प परिसरात श्वानांनी जास्त उपद्रव माजविल्याचे वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. श्वान निर्बीजीकरण्यासाठी उस्मानाबाद येथील संस्थेला प्रथम 2020 मध्ये तीन वर्षांसाठी ठेका दिला. या मुदतीनंतरही याच संस्थेने निविदा भरली व अटी-शर्ती पूर्ण केल्याने जून 2023 पासून ठेका देण्यात आला. ठेकेदार संस्थेच्या पहिल्या तीन वर्षांच्या काळात दैनंदिन 40 श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात. दुसर्या तीन वर्षांसाठीच्या ठेक्यात दैनंदिन 25 श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया उद्दिष्ट होते.
चार वर्षांच्या काळात 20 हजार श्वान निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाल्या. मात्र, 30 सप्टेंबर 2024 पासून सदर संस्थेने हे काम बंद केले. गेल्या 1 जून 2024 ते 31 मे 2025 या वर्षभराच्या काळात तब्बल सात हजार 861 जणांना श्वानांनी चावा घेतल्याची नोंद येथील सामान्य रुग्णालयात, महापालिकेच्या हारुण अन्सारी व कॅम्प रुग्णालयांतून वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झाली आहे. या रुग्णांचे रेबिज प्रतिबंधक लसीकरण झाले आहे. ही आकडेवारी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची गंभीरता स्पष्ट करते. श्वान चावल्यास रेबिज सारखा प्राणघातक आजार उद्भवू शकतो. यासाठी श्वानदंशावर महापालिकेच्या रुग्णालयांसह सामान्य रुग्णालयात रेबिज प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. श्वानदंश झालेल्यांना ही लस इंजेक्शनद्वारे देतात. प्रशासनाने निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य राखावे. मोकाट श्वान व जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.