

major nuisance of stray dog
कोपरगाव : शहरातील विविध प्रभागांसह बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा मोठा उपद्रव वाढला आहे. वर्षभरात कोपरगावात तब्बल 1,083 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश गुट्टे यांनी दिली. दरम्यान, या सर्वांना ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने रेबीज लस टोचण्यात आली आहे.
कोपरगावातील मोकाट कुत्र्यांसह भटक्या जनावरांचा बंदोबस्त पालिका प्रशासन केव्हा करणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक विचारीत आहेत. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्याची टोळी खुलेआम फिरत असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध, व्यापारी नागरिकांना सहन करावा लागत आहे. याप्रश्नी नगरपरिषदेकडे लेखी तक्रार करूनही, ठोस उपाययोजना होत नसल्याने शहरात अगदी वर्दळीच्या भागात भटक्या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे.
दिवस-रात्र मोकाट कुत्री रस्त्यावर टोळीने फिरतात. अनेकदा कुत्री पादचारी, दुचाकी, चार चाकी वाहनांच्या मागे जोर-जोरात भुंकत पळतात. वेळप्रसंगी दुचाकीला अचानक कुत्रे आडवे आल्याने अनेक दुचाकीस्वार अपघातात जखमी झाले आहेत. काहींना कायमची शारीरिक दुखापत झाली आहे, मात्र याप्रश्नी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपालिका प्रशासनाला कधी जाग येणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे.
कोपरगाव नगरपरिषदेने मध्यंतरी मोकाट कुत्रे पकडण्याचे टेंडर दिले होते, मात्र त्याचे पुढे काय झाले? याचे उत्तर अजुनही गुलदस्त्यातच आहे. भटक्या कुत्र्यांची लहान मुलांसह ज्येष्ठांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. शहराच्या सर्व प्रभागातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रीया कराव्या, अशी मागणी आता जोर धरीत आहे. जेणेकरून भटक्या श्वानांच्या प्रजनन वाढीवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस टोचावी. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे चावा घेण्याचे प्रकार वाढत आहे, ही बाब गंभीर आहे. याप्रश्नी तत्काळ लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
कोपरगावात वर्षभरात 1, 083 जणांना मोकाट कुत्र्यांनी तर, मांजर, डुक्कर व सस्तन प्राण्यांनी 10 जणांना चावा घेतला आहे. गंभीर बाब अशी की, यामध्ये पिसाळलेल्या 7 कुत्र्यांचा समावेश आहे. यासर्व रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात श्वानदंशावरील उपचारांसह लस देण्यात आली आहे.