Social Media Culture  
नाशिक

Social Media Culture | व्हिडिओच्या दुनियेतील हिडीस वास्तव...!

Social Media Culture | आजचा काळ व्हायरल होण्याचा आहे. कोणतीही घटना, कोणताही प्रसंग, कोणताही क्षण. क्षणात लाखो मोबाइलमध्ये पोहोचतो.

पुढारी वृत्तसेवा

मोबाइलच्या एका क्लिकवर जग हातात आले... पण या जगाने आपली माणुसकीच हरवली तर? आज समाजमाध्यमांवर फिरणारे काही व्हिडिओ आणि फोटो केवळ कंटेंट राहिलेले नाहीत; ते आपल्या सामूहिक संवेदनशीलतेवर होणारे हल्ले आहेत. कुतूहल, करमणूक आणि माहिती यासाठी सुरू झालेल्या या माध्यमांनी आता विकृती, अश्लीलता आणि निर्दयी उत्सुकतेचा बाजार मांडला आहे. प्रश्न एवढाच आहे, आपण पाहणारे आहोत की, सहभागी गुन्हेगार ?

डॉ. राहुल रनाळकर

आजचा काळ व्हायरल होण्याचा आहे. कोणतीही घटना, कोणताही प्रसंग, कोणताही क्षण. क्षणात लाखो मोबाइलमध्ये पोहोचतो. पण या वेगाच्या नादात आपण काय गमावत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आता निघून चालली आहे. कारण सध्या समाजमाध्यमांवर फिरणारे अनेक व्हिडिओ केवळ धक्कादायक नाहीत, तर ते माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. अतिशय ओंगळवाणे, किळसवाणे आणि हिडीस स्वरूपाचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

ही स्थिती इतक्या वेगाने बिघडेल, याची कल्पना काही दिवसांपूर्वीपर्यंत कुणालाच नव्हती. कोणतेही प्लॅटफॉर्म उघडा, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, तिथे विकृत आशय नजरेस पडतोच. ही केवळ तांत्रिक किंवा अल्गोरिदमची समस्या नाही, तर ती आपल्या सामाजिक आणि नैतिक अधःपतनाची जिवंत साक्ष आहे. व्हायरल हा शब्द एकेकाळी लोकप्रियतेचा मानबिंदू मानला जात होता.

पण आज तो अनेकदा लाजिरवाण्या प्रसिद्धीचे प्रतीक बनला आहे. एखादा अपघात, एखादी खासगी घटना, एखाद्याचा अपमान हे सगळे कंटेंट बनले आहेत. नाशिकमधील खरात प्रकरण असो किंवा त्यानंतर व्हायरल झालेला नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ या घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, लोकांना आता सत्य किवा असत्य याची पर्वा उरलेली नाही. त्यांना फक्त शेअर करायचे आहे. या प्रक्रियेत त्या व्हिडिओमागील माणसाचे आयुष्य, त्याची प्रतिष्ठा, त्याचे कुटुंब हे सगळे दुय्यम ठरते.

इथेच समाज म्हणून आपण हरत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा स्पष्ट निर्देश दिले आहेत की, कोणतेही व्हिडिओ किंवा फोटो परवानगीशिवाय प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. खासकरून जेव्हा ते महिलांशी संबंधित असतात. माहिती-तंत्रज्ञान कायद्यात देखील यावर कठोर शिक्षा आहे. तरीदेखील वास्तव वेगळेच चित्र दाखवते. व्हिडिओ, फोटो व्हायरल करणाऱ्या तब्बल ६५ जणांवर नाशिक पोलिसांनी खरात प्रकरणात गुन्हे दाखल केले, ही बाब धक्कादायक आहे. कारण ती दाखवते की, एका व्हिडिओच्या मागे किती मोठी शेअरिंग साखळी उभी राहते. पण केवळ कारवाई करून ही समस्या सुटणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

कारण प्रश्न कायद्याचा नाही, तर मानसिकतेचा आहे. मानवी स्वभावात कुतूहल असते; पण आज ते कुतूहल विकृतीत परिवर्तित झालेले दिसून येते. एखादा व्हिडिओ पाहताना आपण थांबून विचार करतो का की, हा कुणाच्यातरी आयुष्याचा विनाश करू शकतो? यातून कुणाच्या सन्मानाला धक्का बसतोय का? आपण हे पुढे पाठवून गुन्ह्यात सहभागी होत आहोत का? दुर्दैवाने बहुतेक वेळा असा विचार होत नाही.

फॉरवर्ड बटण इतके सहज झाले आहे की, त्यामागील जबाबदारी आपण विसरलो आहोत. आणि हीच विस्मृती सध्या सर्वात धोकादायक बनू पाहत आहे. या व्हिडिओंचा परिणाम केवळ त्या व्यक्तींवर होत नाही, तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर होतो. सतत अशा गोष्टी पाहिल्यामुळे माणूस बधीर होतो, संवेदनशीलता कमी होते. जे चुकीचे आहे. तेही नॉर्मल वाटू लागते. महिलांविषयीची दृष्टी बिघडते, अपमान, हिंसा, लैंगिक विकृती सामान्य वाटू लागते. विशेषतः तरुण पिढीवर याचा खोलवर परिणाम होतो. त्यांना काय योग्य आणि काय अयोग्य याचा गोंधळ निर्माण होतो.

आज परिस्थिती अशी झाली आहे की, चार लोकांमध्ये बसून सोशल मीडिया उघडणेही अवघड झाले आहे. कुठल्याही क्षणी एखादा अश्लील किंवा अपमानजनक व्हिडिओ समोर येईल, याची भीती वाटते, हीच या परिस्थितीची भीषणता आहे. हेही तितकेच खरे आहे की, सोशल मीडियामुळे अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. अन्याय उघडकीस येतो, सामान्य माणसाला आवाज मिळतो, माहिती वेगाने पोहोचते. पण प्रश्न माध्यमाचा नाही, तर त्याच्या वापराचा आहे. जेव्हा हेच माध्यम नियंत्रणाशिवाय वापरले जाते, तेव्हा ते समाजासाठी घातक ठरते. आज आपण त्याच टप्प्यावर उभे आहोत.

डिजिटल युगात व्ह्यूज, लाइक्स आणि फॉलोअर्स हेच यशाचे मापदंड बनले आहेत. या आकड्यांच्या मागे धावताना अनेक जण कोणतीही मर्यादा ओलांडायला तयार असतात. एखाद्याचा अपमान, एखाद्याचे दुःख, एखाद्याचे खासगी आयुष्य हे सगळे कंटेंट म्हणून वापरले जाते. ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर ती एक प्रकारची क्रूरता आहे. आणि या क्रूरतेला आपणच प्रोत्साहन देतो, जेव्हा अशा व्हिडिओंना व्ह्यू आणि शेअर देतो.

नाशिक पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे, पण हा अंतिम उपाय नाही. सायबर यंत्रणा अधिक सक्षम करणे, त्वरित कारवाई करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनजागृती करणे आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डिजिटल साक्षरता शिकवली गेली पाहिजे. कायदा भीती निर्माण करू शकतो, पण संस्कारच दीर्घकालीन बदल घडवू शकतात.

माध्यमांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. माध्यमांच्या स्पर्धेत अशा घटनांचे अप्रत्यक्ष प्रमोशन होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. पत्रकारिता ही केवळ माहिती देण्याचे साधन नसून, समाजाला दिशा देण्याचे माध्यम आहे. त्यामुळे अशा विषयांवर संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने भाष्य होणे गरजेचे ठरते.

या सगळ्या प्रक्रियेत पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मुलांना तंत्रज्ञान वापरायला शिकवणे सोपे आहे, पण त्याचा योग्य वापर शिकवणे अधिक गरजेचे आहे. काय पाहायचे आणि काय टाळायचे, याची जाणीव लहानपणापासून करून दिली गेली पाहिजे. कारण आजची पिढीच उद्याचा समाज घडवणार आहे.

शेवटी प्रश्न एकच उरतो, आपण काय करणार? प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. कोणताही संशयास्पद किंवा अश्लील व्हिडिओ पुढे पाठवू नये, अशा कंटेंटची तक्रार करावी आणि इतरांनाही जागरूक करावे. 'मी फक्त फॉरवर्ड केला' ही सबब आता चालणार नाही, कारण प्रत्येक फॉरवर्ड हा एका गुन्ह्याची साखळी वाढवत असतो.

प्रत्येक फॉरवर्ड हा केवळ एक क्लिक नसतो

आपण एका निर्णायक वळणावर उभे आहोत. तंत्रज्ञानाचा वापर करून समाज अधिक प्रगल्भ करायचा की त्याच तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन विकृतीला खतपाणी घालायचे, हा निर्णय आपलाच आहे. व्हिडिओंच्या या दुनियेत आपण केवळ प्रेक्षक राहणार की सजग नागरिक म्हणून उभे राहणार? कारण लक्षात ठेवा, प्रत्येक फॉरवर्ड हा केवळ एक क्लिक नसतो; तो आपल्या समाजाच्या भवितव्यावर उमटणारा ठसा असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT