

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील काही काळापासून 'इंडिगो' या एअरलाइन्स कंपनीमागील अडचणी संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या वैमानिक विश्रांतीच्या नव्या नियमावलीचा मोठा फटका कंपनीला बसत असून, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी रविवार (दि. २९) पासून सकाळची नवी दिल्ली व इंदूर विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या उद्योग व पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये केंद्र सरकारने वैमानिक विश्रांतीबाबत नवी नियमावली लागू केल्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका इंडिगो कंपनीला बसला. डिसेंबरपासून कंपनीच्या सेवांवर झालेला परिणाम अद्यापही कायम असून, रविवार (दि. २९) पासून लागू होत असलेल्या उन्हाळी वेळापत्रकातून नाशिक- दिल्ली (सकाळची फ्लाइट) व इंदूर फ्लाइट पूर्णपणे वगळण्यात आली आहे.
त्यामुळे नवी दिल्लीला नाशिककरांना येण्या जाण्यासाठी केवळ सायंकाळच्या फ्लाइट्सचाच पर्याय असणार आहे. याशिवाय मध्य प्रदेश, राजस्थानला जोडणारी इंदूरची सेवाही अनिश्चित काळासाठी बंद केल्यामुळे त्याचा मोठा परिणाम उद्योग आणि पर्यटनावर होणार आहे. दरम्यान, नवी दिल्लीसाठीच्या फ्लाइटमध्ये कपात केली जाऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात होते. विशेषतः उद्योग क्षेत्रातून नवी दिल्लीसाठी दिवसातून दोन वेळेच्या फ्लाइट कायम ठेवाव्यात अशी मागणी केली गेली.
युद्धाचा परिणाम तिकीट दरांवर
इराण - इस्त्रायल युद्धाचा विमानसेवांवरही मोठा परिणाम झाला असून, विमानाच्या इंधन दरात वाढ झाल्याने तिकीट दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ शक्य असल्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यावरील नियंत्रण हटविल्याने, एअरलाइन्स कंपन्यांकडून तिकीट दर वाढविले गेले आहे. त्याचा परिणाम प्रवासी संख्येवर होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारच्या नव्या 66 नियमावलीमुळे विमानसेवेत कपात करावी लागत आहे. केवळ नाशिकच नव्हे, तर अन्य सर्वच ठिकाणच्या सेवांत १० ते २० टक्के कपात करण्यात आली आहे. कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर सेवा पूर्ववत होऊ शकतील, त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे.
- मनीष रावल, उपाध्यक्ष, निमा