मालेगाव : सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवरून मैत्री, मैत्री नंतर जवळीक, चर्चा, मुंबईत भेट, भेटीनंतर तरुणाला शहरातील तरुणीचे व्यसन व चारित्र्य लक्षात येताच त्याने चार हात दूर राहण्याचा प्रयत्न केला. तथापि, तरुणीने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन तरुणाकडून अडीच लाख रुपये रोख, बर्गमन दुचाकी, ९५ हजारांचा आयफोन असा सुमारे साडेचार लाखांना गंडा घातला. इतकेच नव्हे तर या तरुणाच्या भावालाही खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत लाखाच्या मोबाइलची मागणी केली. एखाद्या लघुपटाला शोभेल, असे हे कथानक शहरात घडले आहे.
येथील मोबाइल व्यावसायिक असणाऱ्या दोघा भावांना याची प्रचिती आली. याप्रकरणी तरुणाकडून जबरदस्तीने चार लाख ५५ हजारांचा ऐवज वसूल करणाऱ्या तरुणी शबाना (रा. दहिसर चेकनाका, मुंबई) हिच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तन्वीर हनीफ कुरेशी (२९, रा. गुलशन-ए-मलिक) याच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सहारा कॉम्प्लेक्समधील मोबाइल वर्ल्ड या दुकानात हा प्रकार घडला. तन्वीरची शबानाशी इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर शबानाने तन्वीरला मुंबई येथे भेटण्यास बोलविले.
काही भेटींनंतर तन्वीरला शबाना डान्सबारमध्ये काम करीत देहविक्री करते, दारू पिते यासह विविध वाईट सवयींची माहिती मिळाल्याने तन्वीरने तिच्यापासून काही अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी शबानाने बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ब्लॅकमेल करीत त्याच्याजवळून अडीच लाख रुपये रोख, एक लाख १० हजार रुपये किमतीची बर्गमन, ९५ हजारांचा आयफोन, १४ प्रोमॅक्स मोबाइल असे चार लाख ५५ हजार रुपये जबरदस्तीने वसूल केले. याशिवाय सोमवारी (दि. २७) तन्वीरच्या येथील मोबाइल वर्ल्ड या दुकानात येऊन त्याचा मोठा भाऊ तौसिफ कुरेशी याला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याची धमकी देत त्याच्याकडे ९८ हजारांच्या आयफोन १६ ची मागणी केली. सततच्या ब्लॅकमेलला कंटाळून तन्वीरने संबंधित तरुणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक नितीन गायकर तपास करीत आहेत.