Dengue cases rise : शहरात डेंग्यू, साथरुग्णांत वाढ

दोघा बालकांपाठोपाठ महिलेचा डेंग्यूने बळी
Dengue cases rise
शहरात डेंग्यू, साथरुग्णांत वाढpudhari file photo
Published on
Updated on

मालेगाव : शहरात डेंग्यू व साथ आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश व पेशी कमी झालेल्या शेकडो रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बालरुग्णालये हाउसफुल्ल आहेत. साथ आजारांनी डोके वर काढले असताना येथील सामान्य रुग्णालयात औषधांचा तुटवडा असून, सामान्य रुग्णांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडली आहे. पूर्व भागातील दोन बालकांपाठोपाठ नाशिक येथील रुग्णालयात रुबीनाबानो मोहम्मद असलम (३५, रा. कमालपुरा) या महिलेचा डेंग्यूने बळी गेल्याने खळबळ उडाली आहे.

कमालपुरा भाग हा अतिशय दाट लोकवस्तीचा आहे. येथील रुबीनाबानो हिला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच थंडी-तापाचा त्रास होता. १४ ऑक्टोबरला डेंग्यूचा त्रास झाल्याने तिला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने दीर अशरफ हाजी अफरोज याने तिला नाशिक येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच रुबिनाचा मृत्यू झाला. डॉ. मुर्दूल कुमार यांनी तपासून तिला मयत घोषित केले. रुबिनाला डेंग्यू निष्पन्न झाला होता.

मृत्यूसंदर्भातील कागदपत्रे व अहवाल शहर पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्यानंतर रुबिनाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची आकस्मिक नोंद येथील शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. यापूर्वी दोन बालकांचा डेंग्यूने बळी घेतला आहे. 'पुढारी'ने बुधवार (दि. २९) च्या अंकात यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यापाठोपाठ महिलेचा डेंग्यूने बळी गेल्याची नोंद झाल्याने या वृत्ताला बळकटी मिळाली आहे. वैद्यकीय अधिकारी मात्र, प्रभावी उपाययोजना करण्याऐवजी डेंग्यूसदृश व व्हायरल फीव्हरचे रुग्ण वाढल्याचे सांगून वेळ मारून नेत आहेत.

शहरातील बहुतेक बालरोगतज्ज्ञ साथीचा प्रादुर्भाव लक्षात घेता दीपावली सुटी एक-दोन दिवस उपभोगूनच रुग्णालयात परतले. सामान्य व गोरगरीब जनता शासकीय व सामान्य रुग्णालयाकडे आशेने पाहत असताना या रुग्णालयांमध्ये सलाइनसह सर्वच औषधांचा तुटवडा आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून याबाबत बोंब होत असतानाही आरोग्य विभागाने कुठलीही हालचाल केलेली नाही. डेंग्यू, पेशी कमी होणे याबरोबरच कावीळ, सर्दी, खोकला, थंडी-ताप आदी आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. अशातच महापालिका आरोग्य व स्वच्छता विभागात समन्वयाचा अभाव आहे. त्याचा फटका शहरवासीयांना बसतो.

डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत अत्यल्प वाढ आहे. मनपा आरोग्य विभागातर्फे उपाययोजना व जनजागृती सुरू आहे. आशा वर्कर अॅबेटिंग करीत आहेत. मलेरिया कर्मचारी गप्पी मासे ज्या भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव जाणवला अशा ठिकाणी सोडत आहेत. स्वच्छता विभागाला धुरळणीसाठी (फॉगिंग) पत्र दिले. सर्व खासगी डॉक्टरांनाही डेंग्यूसदृश रुग्ण आल्यास माहिती कळविण्याची विनंती केली आहे. या आजारात अॅबेटिंग, फॉगिंग, स्वच्छता व कोरडा दिवस पाळणे महत्त्वाचे आहे.

डॉ. जयश्री आहेर, आरोग्याधिकारी, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news