प्रातिनिधीक छायाचित्र File Photo
नाशिक

Sinnar Gas Cylinder | घरगुती गॅसच्या अवैध वापरावर कारवाईसाठी सिन्नरमध्ये पथके

Sinnar Gas Cylinder | गॅस एजन्सींची तपासणी; काळाबाजार आढळल्यास कठोर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या निर्देशांनुसार सध्याची जागतिक परिस्थिती व इंधनाच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा अवैध वापर (ब्लॅक मार्केटिंग) रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गॅस एजन्सींची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरावर दक्षता व फिरते पथक स्थापन करण्यात आले असून, सिन्नर तालुक्यातही या अनुषंगाने तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

या पथकाचे प्रमुख तहसीलदार सुरेंद्र देशमुख असून संबंधित पोलिस ठाण्याचे अधिकारी, पुरवठा निरीक्षक, वैधमापन निरीक्षक तसेच संबंधित तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तपासणी पथकाद्वारे तालुक्यातील सर्व गॅस एजन्सींच्या गोदामांची तपासणी वेळोवेळी करण्यात येणार आहे.

तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेल, रिफिलिंग आदी व्यावसायिक कारणांसाठी होणारा अवैध वापर रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात दक्ष राहून घरगुती गॅस सिलिंडरचा गैरवापर होऊ नये यासाठी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्षेत्रात घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर किंवा साठेबाजी होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पथकाच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा

तहसीलदार नागरिकांनी आपल्या घरगुती गॅस सिलिंडरचे बुकिंग नेहमीप्रमाणे नियमानुसार करावी. तालुक्यात सर्व गॅस एजन्सींकडे घरगुती सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून, बुकिंग केलेल्या ग्राहकांना वेळेत सिलिडर पोहोचविच्या सूचना एजर्सीना देण्यात आल्या आहेत, असे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले

... तर परवाना होणार रद्द

गॅस वितरण प्रणाली सुरळीत राहात आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा तसेच गॅस (पुरवठा व वितरण नियंत्रण) आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ग्राहकांची दिशाभूल किंवा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गॅस वितरण एजन्सीचा परवाना रद्द करण्याबाबतच्या सूचना तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT