नाशिक

Sinnar leopard attack | श्वानाची निष्ठा अन् शेतकऱ्याचे प्रसंगावधान! बिबट्याच्या हल्ल्याचा थरार; शेतकरी थोडक्यात बचावला

कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावावा; ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

विंचुरी दळवी

सिन्नर: तालुक्यातील शिवडे बोरखिंड शिवालगत असलेल्या बदोशी मळा परिसरात गुरुवारी सकाळी एक थरारक घटना घडली. शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या पांडु लक्ष्मण निरगुडे (वय : ३५ वर्षे) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, निरगुडे यांचे प्रसंगावधान आणि त्यांच्या पाळीव श्वानाची निष्ठा यामुळे बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि एक मोठा अनर्थ टळला.

गवतात दबा धरून बसले होते तीन बिबटे

पांडु निरगुडे हे गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या पाळीव श्वानासह शेतात जनावरांना चारा कापण्यासाठी गेले होते. ते गवत कापत असतानाच, तिथल्या दाट गवतामध्ये तीन बिबटे दबा धरून बसलेले होते. गवत कापण्याचा आवाज झाल्याने त्यातील दोन बिबटे तिथून पळून गेले. मात्र, निरगुडे यांच्यासोबत श्वान असल्याचे पाहून, त्याची शिकार करण्याच्या उद्देशाने तिसरा बिबट्या थेट निरगुडे यांच्या दिशेने चालून आला.

श्वानाचे भुंकणे आणि शेतकऱ्याचा आरडाओरडा; बिबट्याची झाडावर धाव!

समोर येणारा बिबट्या पाहताच निरगुडे यांनी अजिबात धीर न खचू देता मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. आपल्या मालकाला धोक्यात पाहून त्यांच्या इमानी श्वानानेही बिबट्याच्या रोखाने जोरदार भुंकायला सुरुवात केली. मनुष्य आणि श्वानाचा हा दुहेरी प्रतिकार पाहून बिबट्या गांगरला आणि त्याने थेट जवळच असलेल्या एका झाडावर धूम ठोकली.

वनविभागाची धाव, पण बिबट्या पसार

बिबट्या झाडावर चढल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. सामाजिक कार्यकर्ते उत्तम दादा हारक यांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. सिन्नर वनविभागाचे कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वनविभागाचे पथक पोहोचण्यापूर्वीच बिबट्याने झाडावरून खाली उडी मारून शेजारील बाजरीच्या पिकात धूम ठोकली.

ग्रामस्थांची भीती आणि मागणी

शिवडे आणि बोरखिंड परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या दर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT