

दिंडोरी : तालुक्यातील वलखेड येथील बळवंत शिदे यांच्या शेतात विलास गिरिधर मुरे शेतमजुरी करतात. मंगळवारी (दि. २१) रात्री ८ च्या सुमारास विलासची पत्नी घरासमोरील शेडमध्ये स्वयंपाक करत असताना दोन वर्षाची त्यांची मुलगी ज्ञानेश्वरीसह बसले होते.
अशातच शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक ज्ञानेश्वरीवर झडप घालून तिला जबड्यात पकडून शेतात पलायन केले. शेजारी व परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली. मात्र, बिबट्या बालिकेला घेऊन अंधाराच्या दिशेने पसार झाला. घटनेची माहिती पोलिस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. गावकऱ्यांनी शोध मोहीम राबवली.
रात्री ९ च्या सुमारास रामभाऊ बोंबले यांच्या पेरूच्या बागेत मुलीचा मृतदेह आढळून आला. ज्ञानेश्वरीचे शव उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री शोकाकुल वातावरणात ज्ञानेश्वरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल भट्ट, बागूल, वनरक्षक गोरख गांगोडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. घटनास्थळी तत्काळ पिंजरा लावण्यात आला असून, या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विलास मोरे हे पेठ तालुक्यातील कळमबारी येथील मूळ रहिवासी असून, मजुरीसाठी ते वलखेड येथे आले होते.
तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत चालल्या असून, याआधी पशुधन व कुत्र्यांवर बिबट्यांचे हल्ले होत होते. आता थेट मनुष्यावर बिबटे हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांत दहशत निर्माण झाली आहे.
- रघुनाथ पाटील, माजी सरपंच, वलखेड