Gondeshwar Temple Kiranotsav  
नाशिक

Gondeshwar Temple Kiranotsav | सूर्यनारायण 'शिवा'च्या भेटीला! सिन्नरच्या गोंदेश्‍वर मंदिरात किरणाभिषेकाचा अद्भुत सोहळा

Gondeshwar Temple Kiranotsav | सिन्नरच्या गोंदेश्‍वर मंदिरात किरणाभिषेकाचा अद्भुत सोहळा

पुढारी वृत्तसेवा

सिन्नर : संदीप भोर

सिन्नर शहराचे ऐतिहासिक व धार्मिक वैभव असलेल्या श्रीगोंदेश्‍वर महादेव मंदिरात रविवारी (दि. २७) पहाटे सूर्योदयाच्या वेळी निसर्ग आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम अनुभवायला मिळाला. पूर्व दिशेकडून आलेली सूर्याची कोवळी किरणे नंदी मंडपातून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून शिवलिंगावर पडली.

सूर्यनारायणाने प्रत्यक्ष शिवाची भेट घेतल्याचा हा मनमोहक क्षण पाहण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहून 'किरणाभिषेक' अर्थात 'किरणोत्सव'चा अनुभव घेतला. बाराव्या शतकातील हेमाडपंथी पंचायतन स्थापत्यशैलीतील गोंदेश्‍वर महादेव मंदिराच्या वास्तुरचनेचे वैशिष्ट्य या किरणोत्सवातून अधोरेखित होते.

मंदिराच्या पूर्व-पश्चिम रचनेतून विशिष्ट काळात सूर्यकिरणे गाभाऱ्यात पोहोचून शिवलिंगावर पडतात. पहाटेच्या शांत वातावरणात शिवलिंगावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचे हे दृश्य काही मिनिटांसाठी दिसते. त्यामुळे या काळात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
दरवर्षी सप्टेंबर आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा किरणोत्सव अनुभवता येतो.

यंदा २७ सप्टेंबरपासून सुरू झालेला हा नयनरम्य सोहळा आणखी सुमारे पाच दिवस पहाटे सूर्योदयाच्या वेळी पाहता येणार आहे. सूर्यकिरणे शिवलिंगावर पडण्याचा हा क्षण साधारण पाच ते सात मिनिटे दिसतो.
गोंदेश्‍वर महादेव मंदिराचे अभ्यासक व निरीक्षक दत्ता शेळके यांच्या नित्य निरीक्षणातून गेल्या दहा-बारा वर्षांपासून या किरणोत्सवाची नोंद घेतली जात आहे. मंदिराच्या स्थापत्यशास्त्रीय वैशिष्ट्यामुळे घडणारा हा सूर्यकिरणांचा प्रवास भाविकांसह इतिहास व स्थापत्य अभ्यासकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरला आहे.


महाराष्ट्रात सूर्यकिरणांशी संबंधित अशाच वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यासाठी कोल्हापूरच्या श्रीमहालक्ष्मी अंबाबाई मंदिराचा उल्लेख केला जातो. मात्र, सिन्नरच्या गोंदेश्‍वर मंदिरातील सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे गाभाऱ्यातील शिवलिंगावर पडण्याचा हा अनुभव मंदिराच्या स्थापत्यवैशिष्ट्याची स्वतंत्र ओळख निर्माण करणारा आहे.


किरणोत्सव म्हणजे काय?

गोंदेश्‍वर मंदिराच्या पूर्व दिशेकडून सूर्योदयाची किरणे नंदी मंडपातून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. विशिष्ट रचनेमुळे ही किरणे थेट शिवलिंगावर पडतात. साधारण पाच ते सात मिनिटे दिसणारा हा सूर्यकिरणांचा 'अभिषेक' भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरतो.

पाच दिवस अनुभवता येणार:

यंदाचा किरणोत्सव २७ सप्टेंबरपासून सुरू झाला असून, पुढील सुमारे पाच दिवस पहाटे सूर्योदयाच्या वेळी हा सोहळा पाहता येणार आहे. सूर्यकिरणे शिवलिंगावर पडण्याचा हा क्षण अनुभवण्यासाठी भाविकांनी पहाटे मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर अभ्यासक दत्ता शेळके यांनी केले आहे.

गोंदेश्‍वर महादेव मंदिरात वर्षभर नियमितपणे पूजा व अभिषेकाची सेवा करणारे सतीश सूर्यवंशी, रवि कोठूरकर, सुनील खुळे, अभिषेक उगले, भगवान यांचे किरणोत्सवाच्या निरीक्षण व धार्मिक उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे मंदिराचे अभ्यासक दत्ता शेळके यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT