सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या पारंपरिक भोंगा सेवेला पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिन्नर नगर परिषदेने घेतला असून, सकाळी सहा वाजता तसेच रात्री साडेआठ वाजता वाजणाऱ्या भोंग्यामुळे सिन्नरकरांना पुन्हा एकदा शिस्तबद्ध जीवनशैलीचा अनुभव मिळत आहे.
ही भोंगा सेवा नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या सहकायनि कार्यान्वित करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही सेवा काही काळ बंद होती. भोंगा सेवेमुळे सकाळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळेत उठण्यास मदत होत आहे.
रात्री साडेआठ वाजता भोंगा वाजल्यानंतर दुकाने बंद करणे, घरातील जेवणाची वेळ पाळणे, अशी सिन्नरची जुनी शिस्तबद्ध परंपरा पुन्हा जिवंत झाली आहे. दरम्यान, सिन्नर नगरपालिकेजवळील हुतात्मा स्मारक येथे अनेक दिवसांपासून ज्योत व लाइट बंद अवस्थेत होत्या. याची दखल घेत नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या पुढाकारातून हुतात्मा स्तंभाचे सुशोभीकरण करून ज्योत व प्रकाशयोजना सुरू करण्यात आली. त्यामुळे स्तंभ परिसर अधिक देखणा झाला असून, शहराच्या गौरवशाली इतिहासाला साजेसे रूप प्राप्त झाले आहे.
भोंगा सेवा ही सिन्नर शहराची जुनी, उपयुक्त व शिस्तप्रिय परंपरा आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात ती महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच हुतात्मा स्मारक हे आपल्या बलिदानांची आठवण करून देणारे पवित्र स्थळ आहे. भविष्यातही नगर परिषद नागरिकहिताचे लोकाभिमुख निर्णय घेण्यासाठी कटिबद्ध राहील.विठ्ठल राजे उगले, नगराध्यक्ष