सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
गणेशभक्ती आणि कलेचा अनोखा संगम म्हणजे सिन्नरचे कलाकार संजय क्षत्रिय. गेल्या ३० वर्षांपासून पत्नी वंदना आणि मुली पूजा व अक्षता यांच्या सहकार्याने त्यांनी तब्बल ५० हजार सूक्ष्म गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पाव इंचापासून तीन इंचापर्यंतच्या या मूर्ती शाडूमाती व डिंकाच्या साहाय्याने अत्यंत बारकाईने घडवण्यात आल्या आहेत. त्यांचा ५१ हजार मूर्तींचा संकल्प आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहे.
क्षत्रिय यांनी वयाच्या २२ व्या वर्षी रंगकाम करताना छोटी गणेशमूर्ती पाहिली होती. त्यांना तिथून मोठ्या मूर्तीऐवजी सूक्ष्म गणेशमूर्ती साकारण्याची कल्पना सुचली. सुमारे तीन इंच उंचीच्या विविध रूपांतील एक हजार मूर्ती तयार केल्या. स्थानिक नागरिकांनी त्यांच्या कलेचे कौतुक केल्यानंतर त्यांनी हा कलाप्रवास अखंड सुरू ठेवला.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी क्षत्रिय यांच्या कलेचे कौतुक पत्राद्वारे केले आहे.
२०२१ मध्ये त्यांच्या संग्रहात ३३ हजार मूर्ती होत्या. २०२६ मध्ये हा आकडा ५० हजारांवर पोहोचला. त्रिमुखी, पंचमुखी, नागावर विराजमान, सुपारीवरील गणपती, बाटलीतील गणपती, वाघ, उंदीर व मोरावर विराजमान गणपती, तसेच ५१ गणपतींची दहा थरांची दहीहंडी अशा १०० हून अधिक रूपांमध्ये त्यांनी मूर्ती साकारल्या आहेत. ५१ लहान हत्तींचा संग्रहही विशेष आकर्षण ठरतो.
क्षत्रिय यांनी मंदिरांच्या प्रतिकृतीही साकारल्या आहेत. एक लाख आगपेटीच्या काड्यांपासून सिद्धिविनायक मंदिर, ११ कि. कापसापासून ६ फूट उंच व ५ फूट रुंद अक्षरधाम मंदिर, २५ किलो साबुदाणा व फेव्हिकॉलपासून ताजमहाल, दोन लाख सुवर्णमण्यांचे सुवर्णमंदिर आणि खडूंच्या तुकड्यांपासून अयोध्येतील राम मंदिर, ज्योतिर्लिंगांसह ५१ मंदिरांच्या प्रतिकृती त्यांनी साकारल्या आहेत.
"या छंदासाठी लाखो रुपये खर्च झाले. उत्पन्न मर्यादित असतानाही कुटुंबाने साथ दिली. गणरायाच्या कृपेने अडचणी दूर झाल्या. शाडूमाती पर्यावरणपूरक असल्याने मी तिचाच वापर करतो."- संजय क्षत्रिय, सूक्ष्म मूर्तिकार