नाशिक : प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या तुलनेत नाशिक व त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ कुंभमेळा आव्हानात्मक असणार आहे. आपल्याकडे फारच कमी जागेची उपलब्धता असून, ऐन पावसाळ्यात (ऑगस्ट २०२७) भाविकांसह साधू-महंतांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वांचा आहे. तो स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. कुंभ मंथनातून प्राप्त सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करण्यात येईल. सर्वांच्या सहकार्यातूनच हा कुंभमेळा यशस्वी होईल, असा विश्वास जलसंपदामंत्री, कुंभमेळामंत्री तथा समितीप्रमुख गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने रविवारी (दि. 21) मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पंचवटीतील पंडित विष्णू पलुस्कर सभागृहात 'कुंभ-मंथन' बैठक पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आमदार राहुल ढिकले, आमदार मंगेश चव्हाण, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी जलज शर्मा, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपायुक्त किरणकुमार चव्हाण उपस्थित होते.
मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. कुंभमेळा हा नाशिकच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारा महोत्सव आहे. यामुळे रस्ते, पुलांची कामे होणार आहेत. रस्ते तयार करताना ती दीर्घकाळ टिकतील, असे नियोजन करण्यात येईल. कुंभमेळ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजनांचे नियोजन करण्यात येईल. अमृत स्नानाचा कालावधी पावसाळ्यात असल्याने भाविकांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येईल. कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी आपले योगदान द्यावे, यापुढील काळातही नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या मौलिक सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. शहरातील 'निमा', "आयमा', "नरेडेको', "आयएमए', जिल्हा उद्योग आघाडी, लघुउद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, क्रेडाई यांसारख्या संघटनांच्या प्रतिनिधींनी उपाययोजना सुचवत सूचना केल्या. सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी संजय सोनवणे, हर्षदा भागवत, नारायण जाधव, संकेत काकड, सोनल कासलीवाल, हर्ष देवधर, मिलिंद राजपूत, सुनील आडके, वृषभ बोरा, डॉ. प्रशांत भुतडा, डॉ. निशा पाटील, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी, डॉ. मंगेश थेटे, भाऊसाहेब शिंदे, राजाराम सांगळे, दिलीप तुपे, गोविंद बोरसे, सुजाता बच्छाव, संजय कोटेकर, योगेश जोशी आदी.
नाशिकमध्ये चेंगराचेंगरीसारखी घटना घडू नये यादृष्टीने 'क्राउड मॅनेजमेंट' होण्याची गरज. भाविकांसाठी 'टाइम स्लॉट' निश्चित करावे. आखाड्यांसाठी वापरात येऊ शकेल, अशा स्वरूपाचे 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यात यावे.आशिष नहार, अध्यक्ष 'निमा'
गोदावरी व शहर स्वच्छतेसाठी रोबिटिक्सचा वापर व्हायला हवा. 'वेस्ट टू एनर्जी'चा वापर केल्यास कायमस्वरूपी उपाययोजना करणे शक्य होईल. 'अध्यात्मिक गुरूं'ची ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करावी. भाविक त्यांचे ऐकतील आणि स्नानासाठी गंगेवर एकच गर्दी होणार नाही.गौरव ठक्कर, अध्यक्ष, 'क्रेडाई' नाशिक
नाशिकच्या विमानतळाचे विस्तारीकरण करा. 'इमिग्रेशन'चा प्रश्न सोडविल्यास आंतरराष्ट्रीय भाविक येथे येतील. द्वारका ते नाशिकरोडचे विस्तारीकरण गरजेचे आहे. समृद्धी महामार्गाला विल्होळी, वाडीवऱ्हेपासून जोड द्यावी.ललित बुब, अध्यक्ष, 'आयमा'
कुंभमेळादरम्यान खासगी हॉस्पिटलमधील बेड्सची संख्या वाढवण्याची गरज आहे. कुंभमेळ्यात लागणाऱ्या आरोग्यविषयक सर्व सुविधा पुरवण्यास आम्ही तत्पर आहोत.डॉ. नीलेश निकम, अध्यक्ष, 'आयएमए'
वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने शहरात एबीबी सर्कल, पपया नर्सरी व मायको बॉशसह छत्रपती संभाजीनगर रोडवरील काही ठिकाणी अंडरग्राउंड रोड तयार करावे.
कोकण-मुंबई-उत्तर महाराष्ट्र-पुणे, नागपूर कनेक्टिव्हिटी वाढण्याची गरज.
सिंहस्थ कुंभमेळा लोगोचे अनावरण करा
सिंहस्थापूर्वी आडगाव ट्रक टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा.
नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण, रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म वाढवणे, समृद्धीला कनेक्ट करणारे रोड निर्माण करावे.
धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी 'त्र्यंबकेश्वर-नाशिक-सप्तशृंगगड' असा विचार व्हावा.