

मुंबई : गौरीशंकर घाळे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकात लाखो भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांना गोदावरी पूजनासह अन्य धार्मिक विधीसाठी मोठ्या प्रमाणावर पुरोहितांची गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत.
आलेल्या भाविकांना नाशिक परिसरातील धार्मिक पर्यटन घडवू शकतील अशा टूरिस्ट गाईडसाठीही विशेष अभ्यासक्रम तयार केला जात आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.
अलीकडेच प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यात तब्बल 66 कोटी पर्यटक, भाविकांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात आले होते. 45 दिवसांच्या पर्वकाळात भाविकांच्या संख्येचा उच्चांक गाठला होता.
यात जगभरातील 116 देशांतील 55 लाख परदेशी पर्यटकांचाही समावेश होता. प्रयाग येथील महाकुंभची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी झाली. त्यामुळे आता नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातही भाविकांचा, पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली जात आहेत.
प्रयाग येथील महाकुंभमेळ्यात पुरोहितांची मोठी कमतरता होती. भाविकांची ही गरज ओळखून, तसेच तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची शक्यता कौशल्य विकास विभागाने हेरली आहे. सर्वसामान्य भाविकांना संकल्प सोडणे, पंचोपचार, गोदावरी पूजन, सिंहस्थ पूजन विधी यासह अन्य धार्मिक विधी सांगू शकणारा प्रशिक्षित पुजारीवर्ग उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. यातून एकीकडे भाविकांनाही धार्मिक पर्यटनात साहाय्य होणार असून, युवावर्गासाठीही रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गात किमान 45 तासांच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जात आहे. त्यात 15 तासिका या प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या असतील. किमान बारावी उत्तीर्ण असणार्या कोणत्याही विद्यार्थ्याला हे प्रशिक्षण घेता येणार आहे.
पुरोहित संघाच्या भूमिकेकडे लक्ष
पुरोहित प्रशिक्षणाचा या सरकारी कार्यक्रमावर पुरोहित संघाची काय प्रतिक्रिया येणार, याबाबत या क्षेत्रातील जाणकारांना साशंकता आहे. मात्र, सामान्य पूजेसाठी लागणार्या मनुष्यबळाची गरज लक्षात घेता सहमती घडविण्याचा विश्वास कौशल्य विकास विभागातील उच्चपदस्थांकडून व्यक्त केला जात आहे.