नाशिक : सतीश डोंगरे
१९७९ मध्ये चांदी दरवाढीची लाट आली होती. त्याकाळी गुंतवणूकदारांसह नियमित ग्राहक मालामाल झाले होते. तब्बल ४६ वर्षांनंतर पुन्हा एकदा चांदीची पांढरी लाट आली आहे. या लाटेत तेव्हांच्या दरवाढीचा विक्रम पूर्णत: मोडीत निघाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात चांदीत काही हजार नव्हे तर तब्बल १ लाख २१ हजारांची घसघशीत वाढ झाली आहे. ही वाढ १३५ टक्क्यांपेक्षा अधिक असून, आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोच्च ठरली आहे. चांदी दरवाढीचे हे चंदेरी वादळ कुठे जावून थांबणार हे सांगणे मुश्किल असले तरी, वर्षभरात चांदी खरेदी करणाऱ्यांना सोन्यापेक्षाही चांदीने अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारच नव्हे तर सामान्य ग्राहक देखील सध्या चांदी खरेदीला प्राधान्य देत आहे. चांदी दरवाढीचे कारणे अधिक असले तरी, वाढत्या दरवाढीचे धोकेही आहेत. यासर्व बाबींचा आढावा घेणारा हा सविस्तर वृत्तांत...
आकडे बोलतात...
१ जानेवारी २०२५ रोजी चांदी प्रति किलो ८७,५७८ रु.
१८ डिसेंबर २०२५ रोजी चांदी प्रति किलो २,९०,९० रु.
३५२ दिवसात १,२१,५१२ रुपयांची वाढ
२०२६ मध्ये चांदी ओलांडणार २,५०,००० टप्पा
२०२५ मध्ये चांदीत १३७ तर सोन्यात ४७ टक्क्यांची वाढ
२०२५ मध्ये १.२१ लाखांची वाढ
२०२५ मध्ये चांदीने दरवाढीचा पकडलेला वेग अजूनही कायम आहे. १ जानेवारी २०२५ रोजी चांदीचा दर प्रति किलो ८७ हजार ५७८ रुपये इतकी होता. हा दर १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रति किलो २ लाख ९ हजार ९० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच वर्षभरात चांदीत सुमारे १ लाख २१ हजार ५१२ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ १३७.३४ टक्के इतकी विक्रमी आहे. सोन्याच्या किंमतीही वाढल्या असल्या तरी, चांदीच्या तुलनेत त्या मागे आहेत. चांदीच्या किंमती पुढच्या काळातही वाढत राहतील, असा अंदाज आहे.
२०२६ मध्ये चांदी अडीच लाख पार?
२०२५ मध्ये ज्या गतीने चांदीच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे, त्यावरून चांदी २०२६ मध्ये अडीच लाखांचा टप्पा पार करेल, असाही अंदाज वर्तविला जात आहे. भौतिक टंचाई, औद्योगिक मागणी आणि गुंतवणूकीतील वाढता रस यामुळेच हा धातू नव्या वर्षात भाव खाण्याची शक्यता आहे. सध्या गुंतवणूकदार याचाच विचार करून चांदीत बेसुमार गुंतवणूक करीत आहेत. २०२५ हे वर्षे गुंतवणूकदारांना मोठा परतावा देणारे ठरले आहे. आता २०२६ कडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
तज्ज्ञ म्हणतात... 'पुढे धोका आहे'
चांदीने यंदा दरवाढीचे संपूर्ण विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक गाठला आहे. सोन्यापेक्षाही चांदीतून मोठा परतावा मिळाल्याने, चांदीत ४० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक वाढली आहे. एरवी सोन्यापेक्षा चांदीतील गुंतवणूक निम्म्याहून कमी होती. यंदा मात्र, हा आकडा दुप्पट नव्हे, तर तिप्पट झाला आहे. दरवाढीचा विचार केल्यास, चांदीत अवघ्या ११ महिन्यातच १३७ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविली गेली आहे. तुलनेत सोने ४७ टक्क्यांनीच वाढले आहे. आतापर्यंत सोने हे गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित मानले जात होते. मात्र, त्याची जागा आता चांदीने घेतली आहे. मात्र, असे असले तरी, चांदीत मोठी गुंतवणूक ही धोक्याची ठरू शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. कारण चांदी अत्यंत अस्थिर असल्याने, ती फार काळ उच्चांकावर राहीलच याची शाश्वती देणे अवघड आहे. याशिवाय चांदीचा वापर दाग-दागिन्यांपेक्षा औद्योगिक कारणांसाठी अधिक केला जातो. यामुळे बाजारातील चढउतारांचा या धातुवर लागलीच परिणाम दिसत असल्याने, चांदीत गुंतवणूक करताना, 'जपून जपून जा रे... पुढे धोका आहे' असेच म्हणावे लागेल.
चांदीला पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न
जगावर युद्धाचे सावट कायम असल्याने, सोने-चांदीच्या किंमतीवर त्याचा सातत्याने परिणाम होत आहे. विशेषत: चांदीच्या किंमती सातत्याने प्रभावित होत आहेत. जगभरात चांदीची औद्योगिक कारणासाठी मागणी वाढत असली तरी, मागणीच्या तुलनेत पुरवठा मर्यादीत असल्याने, चांदी भाव घात आहे. इंडोनेशिया आणि चिलीसारख्या देशातील खाणींमधून चांदीचे उत्पादन कमी होत असल्याने, या देशांमधून होणारा पुरवठा घटला आहे. त्यामुळे चांदीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेतत. त्यात यश आले तर चांदीची औद्योगिक मागणी घटण्याची शक्यता आहे. याशिवाय चांदीत गुंतवणूक केलेल्यांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते.
चांदीतील दरवाढ देतेय युद्धाचे संकेत
सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. कधीही युद्धाचा मोठा भडका उडेल अशी स्थिती आहे. विशेषत: महासत्तांमध्ये टोकाची स्पर्धा बघावयास मिळत असल्याने, जग दोन गटात विभागले जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चांदीतील दरवाढ हे युद्धाचे किंवा भू-राजकीय तणावाचे संकेत असू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांकडून सातत्याने वर्तविला जात आहे. कारण जेव्हा अशी स्थिती निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी चांदी किंवा सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अशा काळात मौल्यवान धातूमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. याशिवाय युद्धांमुळे होणारा खर्च आणि सरकारी धोरणे यामुळे चलनवाढ वाढू शकते, ज्यापासून बचाव करण्यासाठी चांदी खरेदी केली जाते.
२०५० साली सोने कि चांदी?
जेव्हा अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागते, अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार हमखास सोने किंवा चांदी या दोन मौल्यवान धातूंमध्ये आपले पैसे गुंतवतात. कारण पैशांचे मुल्य वाढवायचे असेल तर सोने चांदीमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. बऱ्याचदा भविष्याचा वेध घेवूनही या मौल्यवान धातूंमध्ये पैसे गुंतविले जातात. विशेषत: २०५० मध्ये सोने आणि चांदीचा भाव नेमका किती असेल, याचा अंदाज बांधून देखील काही लोकांकडून दीर्घ गुंतवणूक केली जात आहे. २०५० साली चांदीचा दर नेमका किती? हे नेमकेपणाने सांगणे कठीण असले तरी, हे दोन्ही धातू मोठा परतावा देतील यात शंका नाही.
सोने ६६, तर चांदीने ८५ टक्के दिला परतावा
२०२५ हेे वर्षे गुंतवणूकदारांना मालामाल करणारे ठरले. या वर्षात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवानन धातूंनी गुंतवणूकदारांची अक्षरश: झाळी भरली आहे. या वर्षात सोने गुंतवणूकीतून तब्बल ६६ टक्के परतावा मिळाला. चांदीने ८५ टक्के बंपर परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले. हा परतावा आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक ठरला आहे. २०२५ प्रमाणेच २०२६ हे वर्षे देखील गुंतवणूकदारांना मालामाल करणारे ठरण्याची शक्यता आहे.
चांदी दरवाढीची प्रमुख कारणे
१) औद्योगिक मागणीत वाढ
इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात मोबाइल, संगणक, टच स्क्रीन, लाइट स्विच, एलईडी आणि ईव्ही बॅटरी आणि वाहने. सौर ऊर्जा उद्योगात सोलर पॅनेल. वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय उपकरणांसाठी चांदीचा वापर. रासायनिक उद्योगात इथिलीन आॅक्साइड आणि फाॅर्मलडिहाइडसारख्या औद्योगिक रसायनांच्या उत्पादनासाठी चांदीचा वापर. सोल्डरिंग आणि ब्रेझिंग उद्योगात पाइप, नळ आणि इलेक्ट्रॉनिक तारा जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोल्डर आणि ब्रेझिंग मिश्रधातूंसाठी चांदीचा वापर. आरसे आणि आॅप्टिक्ससाठी चांदीचा वापर. आॅटोमोबाइल उद्योगात इंजिन बेअरिंग्जमध्ये चांदीचा वापर. जलशुद्धीकरणासाठी वॉटर प्युरिफायर्समध्ये चांदीचा वापर. याशिवाय ५ जी आणि डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणात चांदीचा वापर वाढला आहे.
२) मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
भारतात चांदीचा पुरवठा मागणीपेक्षा कमी आहे. चीन, यूके, युरोपीय संघ, आॅस्ट्रेलिया आणि दुबई हे भारताचे प्रमुख चांदी पुरवठादार आहेत. तर देशाअंतर्गत राजस्थान, गुजरात आणि झारखंड याठिकाणी चांदीचे उत्पादन घेतले जाते. राजस्थान, गुजरात आणि झारखंड ही प्रमुख चांदी उत्पादक राज्ये आहेत. मात्र, देशांतर्गत उत्पादनांना मर्यादा असल्याने, वाढत्या मागणीची पूर्तता करणे अवघड असल्याने भारताला आयातीवर अवलंबून राहावे लागते. तांबे, शिसे, सोने या धातूंच्या खाणींमधून चांदीचे उप-उत्पादन म्हणून घेतले जाते.
३) गुंतवणूकदारांचा ओघ
आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे बघत आहेत. यापूर्वी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जात होते. मात्र, चांदीतून मिळणारा परतावा लक्षात घेता, चांदीत गुंतवणूक करण्याकडे ओघ वाढत आहे. गुंतवणूकदारांकडून हाेत असलेली मागणी देखील चांदी दरवाढीचे एक कारण आहे.
४) रुपयाची घसरण, अमेरिकेचे धोरण
चांदी दरवाढीला डाॅलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण देखील कारणभूत आहे. रुपयाचे डॉलरच्या तुलनेत वारंवार होत असलेल्या अवमुल्यनाचा थेट प्रभाव मौल्यवान धातूंच्या किंमतींवर होत आहे. याशिवाय अमेरिकेने चांदीवर संभाव्य शुल्काची भीती दाखविल्याने देखील चांदी जगभरात उसळी घेत आहे. याशिवाय अमेरिकेने चांदी पुरवठा साखळी विस्कळीत करण्यासाठी चांदीचा साठा वाढविल्याने, त्याचा जगभरातील चांदीच्या किंमतींवर परिणाम होत आहे.
५) महागाई आणि व्याजदर
जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा लोक चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूकीकडे वळतात. ज्यामुळे मागणी वाढते आणि भाव वाढतात. नेमके हे कारण देखील चांदी दरवाढीला कारणीभूत ठरत आहे. वाढती महागाई, जागतिक मागणी आणि व्याजदरातील बदलांमुळे चांदी दरवाढीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. चांदीसारख्या कमी उत्पन्न देणाऱ्या मालमत्ता गुंतवणूकादारांसाठी अधिक आकर्षक बनल्या आहेत.
६) युद्धजन्य स्थिती
जागतिक स्तरावरील युद्धजन्य स्थितीचा देखील चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. जाणकारांच्या मते, जेव्हा चांदीचे दर वाढतात, तेव्हा जगात युद्धाची स्थिती अधिक तीव्र होते. सैन्यासाठी लागणाऱ्या शस्त्रास्त्रांसह युद्ध सामुग्रीत चांदीचा अधिक वापर होत असल्याने, देखील त्याचा दरांवर परिणाम होत असल्याचा अंदाज आहे.
चांदीचे भाव वाढल्याने ग्राहकांकडून नियमित वापरातील अनेक वस्तू कमी झाल्या आहेत. ग्राहकही कमी झाले आहेत. भाव वाढल्याने ग्राहकांना फायदा झाला आहे. पण व्यापाऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. चांदीचा वापर इंडस्ट्रीमध्ये जास्त वाढत असल्याने हे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.नीर्मल भंडारी, भंडारी ज्वेलर्स
चांदी भविष्यातील सोनं आहे. चायनाची चांदी खरेदी व साठवण, औद्योगिक क्षेत्रात चांदीचा वाढता वापर, आणि पुरवठ्यात होत असलेली कमी यामुळे येत्या पाच वर्षात पाच लाखाहून अधिकचा टप्पा चांदी गाठेल, तर ह्या नववर्षाच्या सुरुवातीला सव्वा दोन लाखाच्या आसपास चांदी राहील.चेतन राजापूरकर , नाशिक
गेल्या अनेक वर्षापासून चांदीला स्थिर भाव होता. दीड वर्षापासून वाढ हाेत आहे. जगभरातून चांदीला मागणी वाढली आहे. सौरऊर्जा पॅनलमध्ये चांदीचा वापर, इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये चांदीचा वापर, आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली युद्ध या सर्व कारणांमुळे भाव वाढत आहेत. सध्या चोख चांदीमध्ये नागरिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करत आहेत.गिरीश नवसे, नाशिक
चांदीचे भाव कल्पनेच्या पलिकडे गेले आहेत. त्यामुळे बाजारात काहीशा प्रमाणात शांतता आहे. याला कारण चांदीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर होलसेल व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वेळात ऐंशी- नव्वद हजारावरून दोन लाखाच्या पुढचा टप्पा चांदीने गाठला आहे. पुढेही भाव वाढतील असा अंदाज आहे.राजेंद्र ओढेकर, ओढेकर ज्वेलर्स