

तानाजी घोरपडे
हुपरी : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडीमुळे चांदी दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या चांदीचा दर प्रतिकिलो 2 लाख 10 हजारांच्या घरात पोहोचला आहे. परिणामी, परपेठांवरील दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याने चांदी खरेदी-विक्रीचे व्यवहार कसे करायचे, अशा विवंचनेत हुपरी व परिसरातील चांदी व्यावसायिक सापडला आहे. चांदीची ही दरवाढ व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे. चांदी दरात सातत्याने होणारी ही वाढ संपूर्ण चांदी व्यवसायाच्या मुळावरच उठल्याने काही व्यावसायिकांनी काही काळासाठी व्यवहार बंद ठेवणे पसंत केले आहे.
चांदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने चांदीची विक्री करून नफा मिळविण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत; पण एवढ्या दरात खरेदी करण्यासाठी खरेदीदार नाहीत, अशी स्थिती आहे. परिणामी, चांदी खरेदी-विक्री करणार्या दुकानदारांनी आता सावध पवित्रा घेत आपले व्यवहार परिस्थितीनुसार करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना काळात चांदीच्या दरात सातत्याने घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला होता. त्यानंतरच्या काळात देशातील सर्वच बाजारपेठेतील सराफ व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू झाल्याने येथील व्यवसायाला काही प्रमाणात ‘अच्छे दिन’ प्राप्त झाल्याचे पाहावयास मिळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये चांदी दरात झालेली तब्बल सव्वा लाख रुपयांची वाढ ही सर्वच चांदी व्यावसायिकांची डोकेदुखी बनली आहे.
पूरक व्यावसायिकांनाही फटका
हुपरीसह परिसरातील आठ ते दहा गावांचा चांदी दागिने बनविणे हाच प्रमुख व्यवसाय आहे. सध्या या व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मंदी आल्याने परिसरातील सर्व प्रकारचे अर्थचक्र थांबले आहे. सध्याच्या परिस्थितीत सराफांनी दागिन्यांची खरेदीच थांबविल्याने येथील चांदी व्यवसायात मोठ्या प्रमाणात मंदीचे वातावरण आहे. परिणामी, उद्योगातील इतर सर्व पूरक व्यावसायिकांनाही त्याचा फटका बसत आहे.
बँकांचा आवाहनाला प्रतिसाद नाही
हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत व पदाधिकार्यांनी तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शिखर बँकेचे व्यवस्थापक गणेश घोडके यांच्या समोर ही व्यथा मांडून या प्रश्नी योग्य तो मार्ग काढण्याची सूचना केली होती. त्यामुळे घोडके यांनी या प्रश्नी सर्व बँकांच्या प्रतिनिधीची बैठक बोलावून घेऊन चांदी उद्योगाला सर्व योजनांतून पूर्ववत कर्ज पुरवठा सुरू करण्याचे आवाहन केले होते; मात्र एकाही बँकेने त्यांच्या आवाहनाला अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.