नाशिक : मागील काही दिवसापासून दरवाढीचा वेग पकडलेल्या चांदीने शुक्रवारी (दि.१२) दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या विक्रमी दरवाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहे. चांदी दरवाढीचा वेग नव्या वर्षातही कायम राहणार आहे. दुसरीकडे सोन्याने देखील नवा उच्चांक गाठला आहे. लवकरच सोने दीड लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
चालू वर्षाच्या सुरुवातीपासून चांदीने दरवाढीचा वेग पकडला. आतापर्यंतचा हा सर्वात विक्रमी वेग ठरला आहे. दरात १०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. त्यामुळे चांदीने सध्या परताव्याच्या बाबतीत सोने आणि शेअर बाजारालाही मागे टाकले आहे. चांदीतील ही दरवाढ पुढेही कायम राहणार असल्याने, नव्या वर्षात चांदीच्या दरवाढीचा नेमका कोणता उच्चांक प्रस्थापित करणार याचा अंदाज बांधणे सराफ व्यावसायिकांना मुश्किल होत आहे. दरम्यान, चांदी नव्या वर्षात दोन लाखांचा टप्पा पार करेल, असा प्रारंभी अंदाज होता. मात्र, दरवाढीची गती बघता चांदीने डिसेंबरच्या मध्यातच दोन लाखांचा आकडा पार केला. १ ते १२ डिसेंबरदरम्यान चांदीने तब्बल २० हजार ३९० रुपयांची दरवाढ नोंदवली. शुक्रवारी (दि.१२) चांदी प्रति किलो जीएसटीसह २ लाख २७ हजार रुपयांवर होती.
सोन्यात साडेचार हजारांची वाढ
दुसरीकडे सोन्याने देखील दरवाढीचा वेग पकडला आहे. शुक्रवारी सोने जीएसटीसह २४ कॅरेट प्रति तोळा १ लाख ३७ हजार १०० रुपयांवर होते. २२ कॅरेट सोने प्रति तोळा १ लाख २६ हजार १३० रुपयांवर होते. सोन्यात एकाच दिवसात ४ हजार ५४० रुपयांची वाढ नोंदवली गेली. एका दिवसातील सोने दरवाढीचे झेप बघता लवकरच सोने दीड लाखांच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
सोने - चांदीचे दर असे (दि.13 डिसेंबर 2025 )
२४ कॅरेट सोने - प्रति तोळा - १ लाख ३७ हजार १०० रुपये
२२ कॅरेट सोने - प्रति तोळा - १ लाख २६ हजार १३० रुपये
चांदी - प्रति किलो - २ लाख २७ हजार रुपये
(सर्व दर जीएसटीसह)