

नाशिक : औद्योगिक मागणीत प्रचंड वाढ आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून चांदीकडे बघितले जात असल्याने, चांदीने दरवाढीचा 'टॉप गिअर' टाकला आहे. मागील काही दिवसांपासून चांदी दरात सरासरी तीन हजारांपेक्षा अधिक रोजची वाढ आहे. बुधवारी (दि.१०) चांदीने सर्व जुने विक्रम मोडीत काढत दरवाढीचा नव्या उच्चांक प्रस्थापित केला असून, चांदी दोन लाखांपासून अवघे सहा पावले दूर आहे. बुधवारी चांदी प्रतिकिलो एक लाख ९४ हजारांवर पोहोचल्याने, डिसेंबरच्या अर्ध्यातच चांदी दोन लाखांचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे.
यंदा सोने आणि चांदीच्या किमतींनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले असून, कधी वेगाने नवीन उंची गाठली तर, कधी मोठ्या घसरणीनंतर अचानक कोसळले. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच चालू डिसेंबरमध्ये सुरुवातीपासूनच दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत दरवाढीचे तुफान आले आहे. मात्र, सोन्याच्या तुलनेत चांदी दरवाढीच्या तुफानाने प्रचंड वेग धरला आहे. मागील काही दिवसांपासून ज्या गतीने सोने-चांदीत वाढ नोंदविली जात आहे, त्यावरून नव्या वर्षात सोने दीड लाखांच्या पार, तर चांदी दोन लाखांचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज वर्तविला जात होता. हा अंदाज आता खरा ठरताना दिसून येत आहे.
विशेषत: चांदीबाबतचा अंदाज तंतोतंत खरा ठरण्याची शक्यता असून, पुढच्या काही दिवसांतच चांदी दोन लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या प्रारंभी सोमवारी (दि. ८) चांदी जीएसटीसह प्रतिकिलो १ लाख ८५ हजार ९२० रुपयांवर होती. बुधवारी (दि.१०) हा दर थेट प्रतिकिलो १ लाख ९४ हजार १५० रुपयांवर पोहोचला आहे. अवघ्या दोन दिवसांत चांदीत आठ हजार २३० रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीचा हा आतापर्यंतचा सर्वात विक्रमी वेग असून, याच वेगाने चांदीत वाढ झाल्यास पुढीच दोनच दिवसांत चांदी दोन लाखांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, चांदीतून मिळणाऱ्या रिटर्न्समुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. याशिवाय सर्वसामान्य ग्राहकांकडून देखील चांदी खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. सध्या चांदीने सोन्याला धोबीपछाड दिली असून, मागील दहा दिवसांत चांदी खरेदीत ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
दहा दिवसांत ११,८४० रुपयांची वाढ
चांदी दरवाढीचा वेग सुसाट असून, मागील दहाच दिवसांत चांदीत तब्बल ११ हजार ८४० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या १ डिसेंबर रोजी चांदीचा दर प्रतिकिलो जीएसटीसह १ लाख ८२ हजार ३१० रुपये इतका होता. बुधवारी (दि.१०) हा दर प्रतिकिलो १ लाख ९४ हजार १५० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या दहा दिवसांत चांदीत ११ हजार ८४० रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी वेगवान वाढ झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
सोने दरात चढउतार
चांदीने दोन लाखांच्या दिशेने आगेकूच केली असली तरी, सोने दरात मात्र सातत्याने चढउतार नोंदविला जात आहे. मागील दहा दिवसांचा विचार केल्यास १ डिसेंबर रोजी २४ कॅरेट सोने दर जीएसटीसह प्रतितोळा १ लाख ३२ हजार ९८० रुपये इतका होता. तर बुधवारी (दि.१०) हा दर १ लाख ३२ हजार ३६० रुपये इतका नोंदविला गेला. दहा दिवसांत सोने दरात ६२० रुपयांची घसरण नोंदविली गेली आहे.
सोने-चांदीचे दर असे
२४ कॅरेट सोने - प्रति १० ग्रॅम - १ लाख ३२ हजार ३६० रु.
२२ कॅरेट सोने - प्रति १० ग्रॅम - १ लाख २१ हजार ७७० रु.
चांदी - प्रतिकिलो - १ लाख ९४ हजार १५० रु.
(सर्व दर जीएसटीसह)