नाशिक महानगरपालिका / Nashik Municipal Corporation Pudhari News Network
नाशिक

Nashik Municipal Corporation | विरोधी पक्षनेतेपदासाठी 'उबाठा'तर्फे प्रथमेश गिते

Nashik Municipal Corporation | महासभेत घोषणेची औपचारिकता शिल्लक

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना (शिंदेगटा) ने उपमहापौरपद पदरात पाडून घेत भाजपसोबत सत्तेत सहभाग घेतल्याने शिवसेना (उबाठा) ला विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी लागली असून, उबाठातर्फे प्रथमेश गिते यांची या पदावर नियुक्ती करण्याचे पत्र गटनेते केशव पोरजे यांनी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सादर केले आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नियमित महासभेत गिते यांची विरोधी पक्षनेतेपदी घोषणा होणे शक्य आहे.

नाशिक महापालिकेत १२२ पैकी सर्वाधिक ७२ जागांवर विजय मिळवत भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली. सत्तास्थापनेच्या ऐनवेळी शिवसेना (शिंदेगटा) शी युती करत भाजपने निरंकुश सत्ता अधोरेखित केली.

वास्तविक पाहता भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाच्या २६ जागा जिंकणाऱ्या शिंदे गटाला महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद मिळणे अपेक्षित होते. परंतु शिंदेगटाने भाजपसोबत सत्तेत सहभागाचा निर्णय घेतल्याने विरोधी पक्षनेते पदावरील शिंदेगटाचा दावा कायद्यातील तरतुदींनुसार संपुष्टात आला. १५ जागा मिळवणाऱ्या उबाठाकडे विरोधी पक्षनेतेपदाची संधी आपसूकच आली आहे.

महापालिका अधिनियमात १९-१ (अअ) नुसार विरोधी पक्षनेते पदाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. त्यात जो निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असेल आणि महापौरांकडून ज्याला तशी मान्यता मिळाली असेल, तो विरोधी पक्षनेता असेल, असे स्पष्टीकरण आहे.

त्यानुसार आता विरोधी पक्षनेतेपद उबाठाकडे जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उबाठाचे महापालिकेतील गटनेते पोरजे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाग १५ मधील नगरसेवक व उबाठाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांचे नाव महापौरांना पत्राद्वारे कळविले आहे. येत्या महासभेत गिते यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीची घोषणा महापौरांकडून केली जाईल.

सभागृहनेते पदासाठी बग्गा, बडगुजर ?

विरोधी पक्षनेतेपदाबरोबरच सभागृहनेतेपदाची घोषणा येत्या शुक्रवारी (दि. २०) महासभेत केली जाणे अपेक्षित आहे. महापौर-उपमहापौरपदानंतर सभागृहनेतेपद हे सभागृहातील महत्त्वाचे पद असल्याने या पदावर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये चढाओढ दिसून येत आहे. या पदासाठी सुधाकर बडगुजर, गुरुमित बग्गा, शाहू खैरे यांच्या नावाची चर्चा आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी रस्सीखेच

स्थायी समिती सदस्यपदाची नियुक्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर आता स्वीकृत सदस्य नियुक्ती प्रक्रियेला वेग येणार आहे. स्वीकृत सदस्यपदावर नियुक्तीसाठी सर्वच पक्षात इच्छुकांची मोठी रांग आहे. भाजप यात आघाडीवर आहे. १२२ नगरसेवकसंख्या असलेल्या नाशिक महापालिकेत दहा स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. या पदासाठी निश्चित कोट्यानुसार भाजपचे सहा, शिवसेना-मनसे आघाडीचे दोन, उबाठा व काँग्रेस आघाडीचे दोन स्वीकृत सदस्य जातील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT