

मडगाव : विशाल नाईक
आधुनिक बंधाऱ्याच्या उभारणीच्या पार्श्वभूमीवर सावर्डे मीराबाग परिसरातील जुवारी नदीवरील पांडवकालीन बंधाऱ्याचे अस्तित्त्व आणि त्याच परिसरात आढळून आलेली प्राचीन शिल्पचिन्हे (पेट्रोम्लिफ्स) यामुळे या स्थळाचे ऐतिहासिक व संशोधनात्मक महत्त्व अधोरेखित झाले आहे. शेकडो वर्षांचा या इतिहास जपणाऱ्या बंधाऱ्याबरोबरच खडकांवरील प्राचीन कोरीव चिन्हांमुळे गोव्याच्या प्राचीन संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण ठेवा उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या स्थळाला ऐतिहासिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यास इतिहास संशोधनाला नवे दालन खुले होण्यासह पर्यटनालाही मोठी चालना मिळू शकते, असे मत इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. मीराबाग येथील २८० कोटी रुपयांच्या प्रस्तावित आधुनिक बंधाऱ्याच्या प्रकल्पामुळे सावर्डे परिसरात सध्या तीव्र आंदोलन सुरू आहे. सावर्डेतील आठ गावांच्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला असून, गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, काँग्रेस यांसारख्या विरोधी पक्षांसह भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने या विषयाला राजकीय वळण मिळाले आहे.
मात्र, या वादाच्या पार्श्वभूमीवर याच परिसरात असलेल्या पांडवकालीन बंधाऱ्याचा ऐतिहासिक ठेवा नव्याने चर्चेत आला आहे. सावर्डे येथील मीराबागला कुडचडेच्या पटेमळला जोडणारा हा प्राचीन बंधारा जुवारी नदीच्या मध्यभागी उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अखंडितपणे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहात कोणत्याही आधुनिक बांधकाम साहित्याचा वापर न करता केवळ मोठ्या गोलाकार दगडांच्या साहाय्याने हा बंधारा उभारण्यात आला आहे.
शेकडो वर्षे नदीच्या प्रचंड पाण्याचा मारा सहन करूनही या बंधाऱ्याची रचना आजही मजबूत आणि सुस्थितीत असल्याचे दिसून येते. या बंधाऱ्यात वापरण्यात आलेले विशिष्ट प्रकारचे गोलाकार दगड परिसरात अन्यत्र आढळत नसल्याने त्यांची वाहतूक आणि बांधकाम तंत्रज्ञान याबाबत संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक, इतिहासप्रेमी आणि संशोधकांनी राज्य पुरातत्त्व विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण तसेच भूगर्भशास्त्र विभागाने या स्थळाची तातडीने पाहणी करून त्याचा सविस्तर अभ्यास करावा, अशी मागणी केली आहे.
या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व अधिकृतपणे नोंदवून त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, आधुनिक बंधाऱ्याच्या वादामुळे प्रकाशझोतात आलेल्या या पांडवकालीन बंधाऱ्यामुळे गोव्याच्या प्राचीन इतिहासाचा एक महत्वपूर्ण अध्याय उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
योग्य संशोधन आणि संवर्धन झाल्यास हे स्थळ भविष्यात ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून विकसित होऊन संशोधक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालून या अमूल्य ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
सखोल अभ्यास होणे आवश्यक प्रा. साखरदांडे
इतिहास संशोचक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकांवरील या पेट्रोग्लिफ्स अत्यंत प्राचीन काळातील मानवांनी तयार केलेले असण्याची शक्यता असून, त्यातून त्या काळातील समाजजीवन, श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते. तसेच या स्थळाचे भूगर्भशास्त्रीय महत्त्वही मोठे असून, खडकांची रचना, त्यावरील कोरीव चिन्हे आणि बंधाऱ्याचे बांधकाम यामुळे या परिसराचा सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले
दै. 'पुढारी'ने वृत्त देताच पर्यटकांच्या भेटी
दै. 'पुढारी'मध्ये या ऐतिहासिक बंधाऱ्याबाबत वृत्त प्रसिद्ध होताच इतिहास संशोधक, अभ्यासक आणि उत्साही नागरिकांनी या स्थळाला भेट देण्यास सुरुवात केली आहे. या भेटीदरम्यान परिसरातील काही खडकांवर प्राचीन काळातील शिल्पचिन्हे, आकृत्या आणि कोरीव रेषा आढळून आल्या आहेत. या शिल्पचिन्हांमुळे या परिसरात प्राचीन काळात मानवी वस्ती आणि सांस्कृतिक जीवन अस्तित्वात असल्याचे संकेत मिळत आहेत.