नाशिक : आगामी लोकसभा निवडणुका आणि राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने प्रत्येक जिल्ह्यात प्रभारी नेमून संघटन बळकट करण्यास सुरुवात केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) देखील मैदानात उतरला असून, संपर्कमंत्री अभियान राबवत २२ जिल्ह्यांमध्ये संपर्कमंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत २२ जिल्ह्यांची जबाबदारी ११ मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक मंत्र्याच्या खांद्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी देत जिंकाच, अन्यथा पर्याय नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या संपर्कमंत्रिपदी उद्योगमंत्री उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे अहिल्यानगर जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकत सत्ता मिळवणे हे अंतिम लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
संपर्कमंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त शासकीय समियांवर शिवसेनेचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर ज्या जिल्ह्यांमध्ये भाजप किंवा राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचे पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणीही मागे न हटता शासकीय समित्यांमध्ये पक्षाचे स्थान मिळवण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
भाजपच्या हालचालींना प्रत्युत्तर महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यानंतर शिवसेनेने संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. दुसरीकडे भाजपने आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करत जिल्हा प्रभारी नेमले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनेही संपर्कमंत्री अभियान सुरू करून संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत.
भुसे यांना धुळे- बुलडाणा
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकऐवजी धुळे आणि बुलडाणा या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भुसे यांना नाशिकऐवजी इतर जिल्हे देण्यात आल्याने शिवसेनेत या निर्णयाबाबत चर्चा रंगली आहे.