Shirdi International Airport Pudhari News Network
नाशिक

Shirdi Airport : शिर्डी विमानतळाचं चांगभलं; नाशिकला पुन्हा डावललं

92 व्या बैठकीत टर्मिनस बिल्डिंग, पार्किंग ॲपरन, नाइट लॅण्डिंगबाबत निर्णय नाहीच

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : सतीश डोंगरे

दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातील भाविक रस्ते, हवाईमार्गे नाशिक गाठणार आहेत. नाशिकच्या रस्ते कनेक्टिव्हिटीचे जाळे विस्तारत असले तरी, हवाई कनेक्टिव्हिटीला बळकटी देण्याची गरज आहे. सिंहस्थ कामांमध्ये नाशिकच्या विमानतळाचाही अपेक्षित विकास होईल, अशी भावना नाशिककर बाळगून असताना, आतापर्यंत नेमक्या उलट्या घडामोडी घडल्याने नाशिककरांच्या अपेक्षांवर पुरते पाणी फिरत आहे.

गेल्या शुक्रवारी (दि. १९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या ९२ व्या बैठकीतही नाशिक विमानतळाचा नामोल्लेखही न करता शिर्डी विमानतळ पार्किंगचाच विस्तार करण्याच्या सूचना दिल्याने, 'सिंहस्थ नाशिकचा, विकास मात्र शिर्डीचा' अशी चर्चा आता रंगत आहे.

ओझर येथे तब्बल २२ एकरांवर उभारलेल्या नाशिक विमनातळाची सेवा आतापर्यंत हेलकावे खाणारी ठरली आहे. प्रारंभी स्पाइस जेट, एअर डेक्कन, टू जेट, इण्डेन, स्टार एअर, एअर अलायन्स, जेट एअरवेज या कंपन्यांनी सुरू केलेल्या सेवा नफ्यात असतानाही बंद केल्या. राजकीय बळ वापरून या एअरलाइन्स कंपन्यांना अन्यत्र पळविल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. आता इंडिगो एअरलाइन्सकडून दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, गोवा या महत्त्वाच्या शहरांना नियमित सेवा सुरू आहे. विशेष म्हणजे दरवर्षी प्रवासी संख्येचा आलेख उंचावत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल २ लाख ४२ हजार ३७२ प्रवाशांनी नाशिकच्या विमानसेवेचा लाभ घेतला. तर, २०२४-२५ मध्ये ही संख्या ३ लाख ४१ हजार ११२ पर्यंत वाढली, म्हणजेच प्रवासी संख्येत ४०.७ टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. याशिवाय विमानतळाच्या इतिहासात गेल्या मार्च महिन्यात विक्रमी ३४ हजार ३४९ प्रवाशांनी विमानसेवेचा लाभ घेत, नाशिकच्या विमानसेवेला पसंती दर्शविली.

हे सर्व आकडे समोर असतानाही, नाशिकची विमानसेवा सुविधांअभावी हेलकावेच खात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकची विमानसेवा टेकआॅफ घेईल, अशी अपेक्षा असताना नाशिकऐवजी शिर्डीलाच अधिक प्राधान्य दिले जात आहे. गेल्या एप्रिल महिन्यात सिंहस्थात हवाई नियोजनाबाबत पार पडलेल्या महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या ९१ व्या बैठकीत नाशिक विमानतळाचा नामोल्लेखही न करता शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळे उभारण्यास व विमानतळाच्या विस्तारीकरणास मान्यता दिली गेली. तर गेल्या शुक्रवारी घेण्यात आलेल्या ९२ व्या बैठकीत शिर्डी विमानतळाच्या पार्किंग सुविधेत वाढ करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. या बैठकीतदेखील नाशिक विमानतळाचा नामोल्लेख केला गेला नाही. त्यामुळे सिंहस्थ नेमका नाशिकचा की शिर्डीचा, असा प्रश्न पुन्हा एकदा नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे.

या कामांकडे कानाडोळा

  • २०० कोटींच्या टर्मिनस बिल्डिंगला तोंडी मान्यता

  • 'पार्किंग ॲपरन'साठी पाठपुराव्यानंतरही अपयश

  • दुसऱ्या 'रन वे'ची निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाची मात्र प्रतीक्षा

  • नाइट लॅण्डिंग सुविधा, मात्र कर्मचारी आणि मेटेनन्सअभावी वापर नाही

  • २०२३ मध्ये केंद्राने आंतरराष्ट्रीय उड्डाणे हाताळण्यासाठी इमिग्रेशन सुविधांना नुसतीच मान्यता

Nashik Latest News

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाला प्राधान्य द्यायला हवे. मुंबई, पुणे नाशिक या सुवर्णत्रिकोणात नाशिक महत्त्वपूर्ण शहर असतानाही या दोन शहरांच्या तुलनेत नाशिकचा विकास होऊ शकला नाही. त्यामुळे सिंहस्थात नाशिक विमानतळाच्या कशा रुंदाव्यात, ही अपेक्षा आहे.
मनीष रावल, उपाध्यक्ष, 'निमा'

चार कॅबिनेट मंत्र्यांचे तोंडावर बोट

राज्य मंत्रिमंडळात राज्यातील हेवीवेट नेते छगन भुजबळ, दादा भुसे, ॲड. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने चार मंत्री आहेत. याशिवाय जिल्ह्यातील १५ पैकी १४ आमदार सत्ताधारी गटाचे आहेत. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपचे पाच आमदार असून, तीन आमदार शहरातील आहेत. मात्र, अशातही नाशिक विमानतळाच्या विकासासाठी प्रयत्न अपुरे पडत आहेत.

शिर्डी, छत्रपती संभाजीनगरचा विकास

वास्तविक, नाशिकची कनेक्टिव्हिटी लक्षात घेता, शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांना नाशिकचे विमानतळ सर्वाधिक सोयीचे आहे. मात्र, अशातही नाशिक विमानतळाचा विस्तार न करता शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याने, राजकीय बळ कमी पडत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT