Water Pollution pudhari photo
नाशिक

Water Pollution News | सातपूर प्रभाग समिती बैठकीत जोरदार राडा! अधिकारी सुस्तावले, नगरसेवक आक्रमक

Water Pollution News | सातपूर प्रभाग समिती बैठकीत खडाजंगी: अधिकाऱ्यांना धारेवर धरत 'घरी बसविण्या'ची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

परिसरातील कचरा, दूषित व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, ड्रेनेजची गंभीर समस्या, बंद पथदीप, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव तसेच धूर फवारणीचा अभाव या मूलभूत नागरी समस्यांवरून सातपूर प्रभाग समिती बैठक गाजली. नागरिकांच्या प्रश्नांवरून नगरसेवकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरीत समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. समस्या सोडविता येत नसतील, तर अधिकाऱ्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, अशा संतप्त शब्दांत नगरसेवकांनी प्रशासनाला सुनावले.

सातपूर विभागीय कार्यालयामध्ये प्रभाग समितीचे सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या समस्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

बैठकीत विश्वास नागरे, नितीन निगळ, इंदुबाई नागरे, अंकिता शिंदे, नयना जाधव, मानसी शेवरे, माधुरी बोलकर, सविता काळे यांच्यासह विविध खात्यांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मोकाट श्वानांच्या प्रश्नावर प्रशासनाला धरले धारेवर

नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी मोकाट श्वानांच्या वाढत्या उपद्रवाचा मुद्दा उपस्थित केला. मोकाट श्वानांच्या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकाट श्वानांचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी त्यांनी केली.

याचबरोबर प्रभागातील ड्रेनेजची समस्या गंभीर झालेली असून अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरांसमोरून वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रेनेजची समस्या तातडीने सोडविली नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना त्याच ड्रेनेजच्या पाण्यात अंघोळ घालू, अशी संतप्त प्रतिक्रिया इंगोले यांनी बैठकीत व्यक्त केली.

दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त

नगरसेविका सविता काळे यांनी काही भागांत गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा मुद्दा मांडला. पिण्याच्या पाण्याचा दर्जा योग्य नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करणे महापालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

घंटागाडी अनियमित; रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

नगरसेविका मानसी शेवरे यांनी प्रभागातील कचरा संकलन व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. अनेक भागांत घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून, घंटागाडी नियमित करून कचरा संकलन व्यवस्था सुरळीत करावी, तसेच आवश्यक त्या भागांत नियमित धूर फवारणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बंद पथदिव्यांमुळे रात्री अंधार

नगरसेवक विश्वास नागरे यांनी अनेक पथदीप बंद असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नगरसेविका इंदुबाई नागरे यांनीही पथदिव्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले. झाडांच्या फांद्या आणि वेली वाढल्यामुळे पथदीप झाकले गेले आहेत. बंद पथदीप तातडीने दुरुस्त करण्याबरोबरच पथदिव्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या व वेलींची छाटणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

खोदकामामुळे जलवाहिन्या फुटल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

येथील गणेशवाडी आणि मुंजोबा चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नळाला येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फेस तयार होत असून, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या या निष्काळजीपणामुळे स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विविध विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेसुमार खोदकामामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. परिसरात सध्या गॅस पाइपलाइन, विद्युत केबल, रामकाल पथ आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. या खोदकामादरम्यान अनेक ठिकाणी मुख्य जलवाहिन्या फुटल्याने सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याची सरमिसळ होत आहे.

नळातून येणारे पाणी इतके दूषित आहे की, ते थेट पिणे आजारपणाला आमंत्रण देणारे ठरत आहे. पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून, भांड्यात पाणी भरताना त्यावर साबणासारखा फेस जमा होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुतांश नागरिक विकतचे जारचे पाणी वापरत आहेत, तर अनेक कुटुंबांना पाणी उकळून व गाळून प्यावे लागत आहे.

वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. 'महापालिका आमच्या आरोग्याशी खेळत आहे का?' असा प्रश्न उपस्थित करीत मुंजोबा चौक व गणेशवाडीतील रहिवाशांनी तातडीने जलवाहिन्यांची दुरुस्ती करून शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT