Unseasonal Rain 2026 Pudhari Photo
नाशिक

Unseasonal Rain 2026 | बागलाणात अवकाळीने 14,809 हेक्टर पिकांचे नुकसान

Unseasonal Rain 2026 | मंगळवारी (दि. ३१) सकाळी शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

पुढारी वृत्तसेवा

सटाणा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यात सोमवारी (दि. ३०) झालेल्या वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास ४४ गावांतील १९ हजार ५५० शेतकऱ्यांचे १४ हजार ८०९ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले. मंगळवारी (दि. ३१) सकाळी शिक्षणमंत्री दादा भुसे, आमदार दिलीप बोरसे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेला एकही शेतकरी पंचनामा आणि आर्थिक मदतीशिवाय बंचित राहणार नाही, अशी ग्वाही याप्रसंगी मंत्री भुसे व आमदार बोरसे यांनी दिली. तालुक्यात सोमवारी दोन टप्प्यांत गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पहिल्या टप्प्यात तुंगनदिगर व परिसरात जोरदार गारपीट झाली, तर दुसऱ्या टप्प्यात सटाणा शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये गारपीट, वादळी वारा आणि मुसळधार पाऊस झाला. यामुळे प्रामुख्याने कांदा पिकाची प्रचंड हानी झाली आहे.

काढून ठेवलेला कांदा शेतातच भिजला असून, काढणीच्या टप्प्यात असलेला कांदा मातीतच खराब होणार आहे. गारपिटीमुळे कांदा पिकाची पूर्णपात कापली गेली असून, गारांचा फटका बसल्याने कांदाही बाधित झाला आहे.

या व्यतिरिक्त कापणीच्या टप्प्यावर असलेला गहू भुईसपाट झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहार धरला असतानाच गारपीट व वादळी वाऱ्यामुळे फुलगळती झाली आहे. याव्यतिरिक्त टरबूज, काकडी, टोमॅटोसह भाजीपालावर्गीय पिकांचीही माती झाली आहे.

तालुक्यातील आंब्याचेही नुकसान झाले असून, गारपीट आणिवादळी वाऱ्यामुळेझाडांखाली अक्षरशः कैऱ्यांचा पाऊस आणि चिखल दिसून आला. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिक्षणमंत्री भुसे यांनी सटाणा, चौगाव, भाक्षी, कौतिकपाडे परिसरात थेट शेतावर जाऊन पाहणी केली.

आमदार दिलीप बोरसे यांनीदेखील गारपीटग्रस्त भागातील शेत शिवारात जाऊन नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांना दिलासा दिला. यावेळी तहसीलदार कैलास चावडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे व आमदार बोरसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शासन स्तरावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तालुक्यातील एकही बाधित शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल तसेच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री भुसे व आमदार बोरसे यांनी दिली आहे.

सकाळपर्यंत गारा जैसे थे

तालुक्यातील मुंजवाड, भाक्षी परिसरात गारपिटीची तीव्रता अधिक होती. परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गारपीट झाली की, मंगळवारी सकाळी ८-९ पर्यंतदेखील शेत शिवारातील गारा विरघळलेल्या नव्हत्या. यावरूनच नुकसानीची तीव्रता समजत आहे.

घरांची पडझड

वादळी वाऱ्यामुळे काही गावांमध्ये घरांचे छत व जनावरांच्या गोठ्यांचेही छत कोसळून आर्थिक हानी झाली. वादळामुळे विविध रस्त्यांवर मोठे वृक्ष कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती, तर विजेचे खांब आणि तारा कोसळल्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू होऊ शकलेला नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT